Breaking : आंबेशेतमध्ये भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे बंद घर जळून खाक, कुटुंबावर संकट

रत्नागिरी : शहरातील आंबेशेत परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण आग दुर्घटनेमुळे एक कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत बंद घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, रोख रकमेसह मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आंबेशेत येथील रहिवासी संजय देवजी घाणेकर यांच्या बंद घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेतली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका श्रद्धा हळदणकर, नगरसेवक गणेश भारती, सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलावण्यात आला.

अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत घरातील फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम आगीत जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, घाणेकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Shree clinic

या घटनेनंतर सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर यांनी पीडित कुटुंबाला तातडीची दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. स्थानिक नागरिकांनीही या कुटुंबाला धीर देत विविध स्वरूपात मदतीचा हात पुढे करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, या आगीत संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने घाणेकर कुटुंब रस्त्यावर आले आहे. शासनाने आणि प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे आंबेशेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.