जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम; ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने होणार दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण
रत्नागिरी: ‘Ratnagiri Primary Health Care Training’ (रत्नागिरी प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण) या अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच अधिक सक्षम, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य सरकारच्या ‘अधिक उपचार, कमी संदर्भ’ (More treatment, fewer referrals) या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने आयोजित केले जात आहे. जिल्हा प्रशिक्षण पथकाचे डॉ. शरण काठोळे व त्यांच्या प्रशिक्षित प्रशिक्षक टीमच्या सहाय्याने या संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन केले जात आहे.
हे प्रशिक्षण दोन दिवसीय निवासी स्वरूपात आयोजित करण्यात आले असून, यामध्ये तांत्रिक सत्रे, संवाद, गट चर्चा, प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभागी कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य अधिक सक्षम करण्यात येत आहे. या विशेष प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सहायक, एएनएम (ANM), एमपीडब्ल्यू (MPW) तसेच आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. प्राथमिक आरोग्य संस्थांमधील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या प्रमुख विषयांवर होणार सविस्तर प्रशिक्षण:
या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गामध्ये प्रामुख्याने खालील घटकांवर तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे:
- गर्भधारणा, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची माता काळजी.
- नवजात शिशू व बाल आरोग्य सेवा, बालक व किशोरवयीन आरोग्य.
- कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य सेवा.
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन.
- सामान्य संसर्गजन्य आजारांचे वेळेवर निदान व उपचार.
- असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, तपासणी व व्यवस्थापन.
- डोळे, कान, नाक आणि घसा यांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवा.
“या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिकाधिक रुग्णांवर स्थानिक पातळीवरच उपचार करणे शक्य होईल, अनावश्यक संदर्भ (Referrals) कमी होतील आणि नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल.” — डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 16-07-2026














