रत्नागिरी जिल्ह्यात 10 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी येत्या 10 जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.

जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनांतर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच विषयासंदर्भात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय जिल्ह्यात खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड तसेच देवरूख येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साफयीस्ट कंपनी, खेड येथील कोकाकोला कंपनी, जयगड येथील वाटद खंडाळा प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिकांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशावेळी आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. जिल्ह्यात बहुतांशी गावांमध्ये हिंदु-मुस्लिम, बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने काही वैयक्तिक कारणांमुळे जातीय तणावाच्या घटना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच सध्या ओबीसी व मराठा आरक्षणावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेले असून त्यावरून आंदोलनात्मक कार्यक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 29-05-2026