रत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
ही पावसाळी मासेमारी बंदी केवळ यंत्रचलित व यांत्रिक नौकांना लागू राहील. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना यातून सूट देण्यात आली आहे. समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी १ जून पूर्वी मासेमारी बंदरात परतणे अनिवार्य आहे. तसेच ३१ जुलै किंवा त्यापूर्वी कोणत्याही नौकेला समुद्रात जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (१२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांसाठी केंद्र शासनाचे धोरण आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून १२ सागरी मैलाच्या आत मासेमारी करणाऱ्यांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम २०२१ च्या कलम १४ आणि १७ अन्वये नियम मोडणाऱ्या नौका, नौकेवरील उपसाधने, मासेमारी सामुग्री आणि पकडलेली मासळी तात्काळ जप्तीची कारवाई करण्यात येईल. संबंधित दोषींवर कायद्यानुसार जास्तीत जास्त कठोर शास्ती (दंड) लादण्यात येईल. बंदीच्या काळात मासेमारी करताना अपघात झाल्यास, अशा नौकेला शासनाकडून कोणतीही आर्थिक किंवा अन्य प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 01-06-2026














