रत्नागिरी : रत्नागिरीतील बसस्थानकाची इमारत आणि तेथील सुविधांची पाहणी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अनुपस्थितीत करायची होती. त्या अनुषंगाने मी पाहणी केली. रत्नागिरी बसस्थानकाचे काम काैतुकास्पद असून, हा पॅटर्न संपूर्ण राज्यभरात अवलंबण्यात येत असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणगाव ते रत्नागिरी, गणपतीपुळेपर्यंतच्या सर्व बसस्थानकाची पाहणी केली. त्यांनी रविवारी (३१ मे) नव्याने बांधण्यात आलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन विविध प्रवासी व कर्मचारी सुविधांची पाहणी केली. बसस्थानकातील हिरकणी कक्ष, चालक-वाहक विश्रांतीगृह, स्वच्छतागृहे तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या विविध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष लक्ष देत रत्नागिरी बसस्थानकाचे अद्ययावत व सुसज्ज इमारत बांधली आहे. दि. १ जून रोजी एसटीचा वर्धापन दिन असून, त्याचे औचित्य साधून बसस्थानकातून शाैचालय सुविधा मोफत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय बसेसच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, त्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. बसेसची पूर्तता आणि सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतही विशेष उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बंद गाळे उपलब्ध करून देणार
रत्नागिरी बसस्थानकातील बंद गाळे शहरातील स्थानिक दराने उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार याबाबत लवकरच निविदा जाहीर करून बचतगटांसह इच्छुकांना गाळ्यांची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 01-06-2026














