◼️ गुहागरच्या सुकन्येने ‘मिशन इंडिया समिट’ मोहिमेद्वारे प्रस्थापित केला अनोखा विक्रम; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा दिला संदेश
गुहागर:
Grihitha Vichare Mountaineer | महाराष्ट्रातील ११ वर्षीय भारताची युवा गिर्यारोहक ग्रिहिथा सचिन विचारे हिने ‘मिशन इंडिया समिट १६ राज्ये, १६ शिखरे’ या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मोहिमेद्वारे अवघ्या ३२ दिवसांत भारतातील १६ राज्यांमधील १६ सर्वोच्च शिखरे यशस्वीरित्या सर करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवासी आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे सचिन विचारे यांची ग्रिहिथा ही सुकन्या आहे. एवढ्या कमी वयात हा टप्पा गाठणारी ती भारतातील सर्वात युवा महिला पर्वतारोहक ठरली असून, तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अवघ्या ३२ दिवसांत १५ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास
‘मिशन इंडिया समिट १६ राज्ये, १६ शिखरे’ ही आव्हानात्मक मोहीम २३ एप्रिल रोजी मुंबई येथून सुरू झाली होती आणि २५ मे रोजी गुजरातमध्ये तिची यशस्वी सांगता झाली. फक्त ३३ दिवसांच्या एकूण कालावधीत ग्रिहिथाने १६ भारतीय राज्यांमधून प्रवास केला. या मोहिमेची आकडेवारी थक्क करणारी आहे:
- हवाई प्रवास: १५ विमानांद्वारे ९,१४१ किलोमीटर प्रवास.
- रस्ते प्रवास: विविध वाहनांच्या माध्यमातून ५,४८० किलोमीटर अंतर पार.
- रेल्वे प्रवास: ६१८ किलोमीटरचा प्रवास.
- ट्रेकिंग आणि चढाई: १३० किलोमीटरचे पायी ट्रेकिंग.
- शहरांचा संपर्क: या प्रवासादरम्यान तिने ३० पेक्षा अधिक शहरांमधून प्रवास केला.
‘काळसुबाई’ ते ‘गिरनार’; देशातील १६ सर्वोच्च शिखरांवर चढाई
गेल्या चार वर्षांपासून सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्वत मोहिमा पूर्ण करणाऱ्या ग्रिहिथाने या मोहिमेदरम्यान देशातील विविध भागांतील महत्त्वाच्या शिखरांना गवसणी घातली. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर काळसुबाई, सॉसोर्गोर (गोवा), मुल्लायनगिरी (कर्नाटक), मिसापुलिमला (केरळ), डोड्डाबेट्टा (तामिळनाडू), पातळ टोका (तेलंगणा), देओमाली (ओडिशा), गौरलता (छत्तीसगड), परसनाथ (झारखंड), संडकफू (पश्चिम बंगाल), तुमजांग शिखर (आसाम), करोह शिखर (हरियाणा), पंजाबमधील सर्वोच्च शिखर, गुरु शिखर (राजस्थान), धुपगड (मध्य प्रदेश) आणि शेवटी गिरनार (गुजरात) या शिखरांचा समावेश आहे. या मोहिमेला ‘नॅशनल असोसिएशन ऑफ रियलटोर्स इंडिया’चे प्रायोजकत्व लाभले होते.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा देशव्यापी संदेश
या ऐतिहासिक मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रिहिथाने केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. संपूर्ण मोहिमेदरम्यान तिने प्रत्येक शिखरावर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा सामाजिक संदेश असलेले बॅनर प्रभावीपणे फडकावले. ‘सशक्त मुलगी म्हणजे सक्षम राष्ट्र’ हा विचार मांडत तिने महिला शिक्षण आणि महिला सशक्तीकरणासाठी देशभरात जनजागृती केली. या मोहिमेपूर्वी तिने उत्तराखंडमधील केदारकंठ आणि हिमाचल प्रदेशमधील माउंट युनाम ही आव्हानात्मक शिखरेही सर केली असून, आतापर्यंत तिने भारतातील एकूण १८ राज्यांमध्ये पर्वतारोहण मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 04-06-2026














