◼️ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात नाट्यमय घडामोडी; अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवडून येण्याची शक्यता
रत्नागिरी: Konkan MLC Election 2026 : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी एक अत्यंत मोठी आणि नाट्यमय राजकीय घडामोडी समोर आली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गुरुवारी (ता. ४ जून) दुपारी बाळ माने यांनी भाजपचे नेते व मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे काढून घेतला. ऐनवेळी मविआच्या प्रमुख उमेदवारानेच माघार घेतल्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत सुनील तटकरे हे बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणुकीतील घोडेबाजाराचा माने यांच्याकडून उल्लेख
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार बाळ माने यांनी आपल्या या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. “सध्याच्या निवडणुकीतील घोडेबाजार आणि मतदारांची एकूण पक्षनिहाय आकडेवारी पाहता, महाविकास आघाडीला या निवडणुकीत यश मिळणे दूर वाटत होते. संख्याबळ आणि बदललेली परिस्थिती लक्षात घेऊनच आपण या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे विधान बाळ माने यांनी केले. या मतदारसंघात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे आकडेवारीवरून दिसत होते, त्यातच माने यांनी अचानक माघार घेतल्याने महाविकास आघाडीला कोकणात मोठा राजकीय धक्का बसला आहे.
कोकणातील पक्षनिहाय बलाबल ठरले निर्णायक
कोकण स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील एकूण ८३१ मतदारांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सुरुवातीपासूनच महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले होते. या निवडणुकीतील एकूण पक्षनिहाय संख्याबळ खालीलप्रमाणे होते:
- शिवसेना (शिंदे गट): २३६ मते
- भारतीय जनता पक्ष (भाजप): १५१ मते
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ६३ मते
- शिवसेना (ठाकरे गट): ५५ मते
- काँग्रेस: ५० मते
या आकडेवारीनुसार सत्ताधारी महायुतीकडे मतांचा मोठा वाटा असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्यासमोर मोठे आव्हान होते.
अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर
बाळ माने मूळचे भाजपचे नेते असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाने त्यांच्यावर विश्वास टाकत थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी घेतलेल्या या अनपेक्षित निर्णयामुळे चुरशीची वाटणारी ही निवडणूक आता एकतर्फी झाली आहे. इतर अपक्ष उमेदवारांच्या अर्जांची छाननी आणि माघारीनंतर महायुतीचे अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून केली जाण्याची औपचारिकता आता शिल्लक राहिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:42 04-06-2026














