रत्नागिरी : दिवाळी म्हटलं की आनंद, जल्लोष आणि उत्साह, सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. सांस्कृतिक संपन्नतेचे प्रतीक म्हणून दीपोत्सवाचे आगमन झाले आहे. दिवाळी मैफलीतून शहराची सांस्कृतिक उंची वाढते, असे उद्गार बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी काढले.
रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे २ नोव्हेंबर रोजी “सूर निरागस हो” या सुगम संगीत, अभंगाची सुरेल दिवाळी पाडवा मैफलीचे आयोजन जयेश मंगल पार्क येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होत. देशातील मुलांच्या ओठावर कोणती गाणी आणि हातात कोणती पुस्तके आहेत यावर देशाचे भविष्य निश्चित होते, असेही यावेळी ॲड. पाटणे यांनी सांगितले.
या मैफलीत युवा कलाकार चैतन्य परब यांनी आपली गीते सादर केली. सुरवातीला आई सौ. विनया परब यांच्याकडे शिक्षण घेतल्यावर पुढील शिक्षण पं.जयतीर्थ मेवूंडी यांच्याकडे गुरुकुल धर्तीवर घेतले. चैतन्य यांनी “आरंभी वदीन अयोध्येचा राजा”, “आकार उकार मकार”, “राजस सुकुमार” आणि “भाग्यदा लक्ष्मी” असे एकावर एक असे सुंदर अभंग गाऊन मैफल अतिशय रंगतदार करून उंचीवर नेऊन ठेवली.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनजंय कुळकर्णी यांनी उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन संगीत मैफलीचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. चैतन्य परब व इतर साथीदारांचा सत्कार उद्योजक दीपक गद्रे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी केले. या मैफलीला केदार लिंगायत यांनी तबला, मंगेश चव्हाण यांनी पखवाज, चैतन्य पटवर्धन यांनी हार्मोनियम, मंदार जोशी यांनी बासरीसाथ केली. ध्वनिसंयोजनाची जबाबदारी सावंत यांनी सांभाळली.
या मैफिलीला उद्योजक आनंद देसाई यांचे सहकार्य लाभले. ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी हॉल उपलब्ध करून दिला. या प्रसंगी ॲड. विजय साखळकर, सचिव ॲड. रत्नदीप चाचले, ॲड. शाल्मली आमबुलकर, ॲड. अवधूत कळंबटे आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 04/Nov/2024