रत्नागिरी : राज्य सरकारने आंबा आणि काजू बागायतदारांसाठी जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. एका झाडाला (कलमाला) केवळ २२० रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या अन्यायाविरोधात संपूर्ण कोकण पेटून उठला असून, येत्या १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते थेट मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी रत्नागिरीत दिला.
‘एका कलमाला २२० रुपये म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा’
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, शासनाने आंबा आणि काजू उत्पादकांसाठी २२ हजार रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र, जर याचा हिशोब केला, तर एका कलमाच्या (झाडाच्या) वाट्याला केवळ २२० रुपये येतात. ही मदत नसून कोकणातील आंबा बागायतदारांची आणि शेतकऱ्यांची उघड उघड थट्टा आहे. हा अन्याय शेतकरी खपवून घेणार नाहीत.
कॅनिंग कंपन्यांना थेट इशारा: ‘आंबा रोखून धरू’
यावेळी राजू शेट्टी यांनी आंबा कॅनिंग करणाऱ्या उद्योजकांनाही खडे बोल सुनावले. कॅनिंगसाठी लागणाऱ्या आंब्याचे दर उद्योगांनी जाणीवपूर्वक पाडले आहेत. अशा प्रकारे दर पाडून जर आंबा बागायतदारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही कॅनिंगला एकही आंबा घालणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच, कॅनिंगला जाणारा आंबा रस्त्यावरच रोखून धरला जाईल आणि बागायतदार आपला रोष व्यक्त करतील, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली.
१५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर मोर्चा
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १५ मे रोजी दुपारी ३.३० वाजता गिरगाव चौपाटीवरून थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाचही जिल्ह्यांतील आंबा शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चाला काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांनीही आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारने या मोर्चाकडे गांभीर्याने न बघितल्यास सरकारला याचे फार मोठे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
ममता बॅनर्जी आणि केंद्राच्या ‘अमर्याद सत्ते’वर निशाणा
पत्रकार परिषदेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याबाबत आणि देशातील राजकीय परिस्थितीवरही राजू शेट्टी यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारने त्यांना इंग्रजी राजवटीसारखी दुय्यम वागणूक दिली. यामुळे त्यांच्यात जर बंगाली अस्मिता जागृत झाली असेल, तर त्यात काहीही गैर नाही. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा बंडाचा पवित्रा म्हणजे केंद्र सरकारसाठी एक मोठा इशारा आहे. आज बंगालने हा पवित्रा घेतला आहे, उद्या दक्षिणेकडील राज्येही याच मार्गावर जाऊ शकतात. “अमर्याद सत्ता हातात आली आहे म्हणून तुम्ही काहीही करू शकता, असे समजू नका,” असा घणाघात शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केला.














