Dapoli Beach Car: दापोली किनाऱ्यावर पुन्हा समुद्रात अडकली कार; पुणे येथील पर्यटकांचे बेजबाबदार वर्तन

◼️ आंजर्ल्यापाठोपाठ सालदुरे खाडी परिसरात स्टंटबाजी महागली; स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ

दापोली: दापोली Beach Car ची एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक घटना ३ मे रोजी सायंकाळी दापोली तालुक्यातील सालदुरे खाडी परिसरात घडली. आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर सावणे येथे कार समुद्रात अडकल्याची घटना ताजी असतानाच, पुणे येथील पर्यटकांची एक कार खाडीकिनाऱ्यावरील चिखलात अडकल्याचे समोर आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालवून स्टंटबाजी करण्याच्या पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिक प्रशासनाच्या अंमलबजावणीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्टंटबाजी करताना चिखलात अडकली कार; भरतीपूर्वी महिला व मुलांना काढले बाहेर

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुणे येथील काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर कार चालवून स्टंटबाजी करत होते. यादरम्यान त्यांची कार खाडीकिनाऱ्यालगतच्या दलदलीत आणि चिखलात वाईट पद्धतीने रुतली. घटनेची माहिती मिळताच सालदुरे येथील स्थानिक ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. समुद्राची भरती सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांनी कारमधील महिला, पुरुष आणि लहान मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

ग्रामस्थांच्या तासाभराच्या अथक प्रयत्नांना यश

कार चिखलात पूर्णपणे रुतल्याने आणि भरतीची वेळ जवळ येत असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. हे वाहन वेळेत बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक निवेदान शेवडे, रुपेश शेवडे आणि विपुल शेवडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. सुमारे तासभर चाललेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर अखेर ती कार सुरक्षितपणे चिखलातून बाहेर काढण्यात यश आले. ग्रामस्थांच्या या सतर्कतेमुळे एक मोठी संभाव्य दुर्घटना टळली आहे.

वाहनबंदी आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह; स्थानिक नागरिक आक्रमक

दापोली तालुक्यातील आंजर्ले, हर्णे, मुरुड आणि परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांकडून वाहने चालवण्याचे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. वास्तविक पाहता, समुद्रकिनाऱ्यावर शासकीय वाहनबंदीचे आदेश लागू आहेत. मात्र, या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पर्यटकांच्या व स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

किणारपट्टी भागात प्रशासनाने कायमस्वरूपी बॅरिकेड्स लावणे, सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, नियमित गस्त घालणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. “प्रत्येक वेळी ग्रामस्थांनीच मदतीला धावून जायचे का? भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल आता दापोलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 05-06-2026