Konkan Vidhan Parishad Election 2026: बाळ माने यांच्या माघारीनंतर रोहित पवारांचा तटकरेंवर निशाणा..

रत्नागिरी: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. बाळ माने यांच्या या धक्कादायक माघारीमुळे Konkan Vidhan Parishad Election आता पूर्णपणे बिनविरोध झाली असून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मतदारसंघातून महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली होती.

शिंदे गटाचा विरोध मावळला; रोहित पवारांचा ‘तडजोडी’चा गौप्यस्फोट

या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच शिवसेना शिंदे गटाकडूनही सुरुवातीला तीव्र दावा करण्यात आला होता. कोकणातील शिवसेना शिंदे गटाचे बहुतांश स्थानिक नेते सुनील तटकरे यांच्या उमेदवारीच्या विरोधात होते, मात्र वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर हा विरोध मावळला आणि अनिकेत तटकरे यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि उमेदवारीच्या पडद्यामागील सूत्रांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कोकणातील शिंदे गटाच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी या ठिकाणी ‘पालकमंत्री’ पदाची मोठी राजकीय तडजोड झाली असावी, असा थेट गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पूर्वी सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि पक्षाला होणाऱ्या अडचणींवर बोट ठेवणारे नेते आता अचानक शांत कसे झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, ते जर तटकरांवर विश्वास ठेवत असतील तर ते एका वेगळ्याच स्वप्नात वावरत आहेत, असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

“सुनील तटकरेंनी फक्त परिवाराचा विचार केला”; रोहित पवारांचा प्रतिहल्ला

रोहित पवार यांनी दुसऱ्यांच्या पक्षात लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात लक्ष द्यावे, या सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचाही आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. महायुतीकडून होत असलेल्या चुकांवर आम्ही सातत्याने बोलत राहू, असे स्पष्ट करत त्यांनी तटकरे यांच्या राजकीय प्रवासावर टीका केली.

सुनील तटकरे यांनी कोकणात पक्षासाठी कष्ट घेतल्याचा दावा फेटाळताना रोहित पवार म्हणाले की, जर त्यांनी खरोखरच पक्षासाठी कष्ट घेतले असते, तर आज कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हाची अशी वाताहात झाली नसती. तटकरे यांनी कोकणच्या राजकारणात केवळ स्वतःच्या परिवाराचा आणि त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा विचार केला, पक्षाचा विचार कधीही केला नाही; म्हणूनच खऱ्या अर्थाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला.

खरात प्रकरणावरून नाव न घेता सुनील तटकरेंवर टीका

याच पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी बहुचर्चित खरात प्रकरणाचा संदर्भ देत महायुतीतील अंतर्गत दुजाभावावर बोट ठेवले. खरात प्रकरणात केवळ रूपाली चाकणकर यांना ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले, ज्यामुळे त्यांना आपल्या पदाचा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, असे रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला की, ज्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, त्या प्रकरणाशी संबंधित इतर मोठ्या नेत्यांची मात्र महायुतीत सातत्याने राजकीय प्रगती होताना दिसत आहे. त्यापैकी एक जण खासदार झाला, एक मंत्री झाला, एक आमदार झाला आणि आता विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आणखी एक जण आमदार होत आहे. एका बाजूला पक्षातील एका व्यक्तीची सर्व पदे काढून घेतली जातात, तर दुसरीकडे दुसऱ्या नेत्याच्या कुटुंबात पदे वाढवून दिली जातात, अशी दुटप्पी भूमिका सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 05-06-2026