रत्नागिरी: Konkan Vidhan Parishad Election 2026 च्या नाट्यमय घडामोडींनंतर कोकणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) उमेदवार बाळ माने यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. या सर्व घडामोडींवर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी बाळ माने यांच्यावर अत्यंत बोचरी आणि कडक शब्दांत टीका केली आहे. “बाळ माने हा भाजपचाच ओरिजनल आहे. निवडणूक आली की तो तळ्यात-मळ्यात करतो. बाळ मानेला सिरीयस घेऊ नका, तो प्रत्येक निवडणुकीत ५ वर्षांची तडजोड करतो,” अशा शब्दांत राणेंनी मानेंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“चोराच्या उलट्या बोंबा”; विनायक राऊतांनाही टोला
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अनिकेत तटकरे (Sunil Tatkare यांचे पुत्र) यांच्या विरोधात बाळ माने शड्डू ठोकून उभे होते. मात्र, ऐनवेळी भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बाळ मानेंनी माघार घेतली.
यावरून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी बाळ मानेंचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला होता. या टीकेचा समाचार घेताना नारायण राणे म्हणाले, “विनायक राऊत हे काय शब्द पाळणारे आहेत का? विनायक राऊतांचे बाकी धंदे बंद झाले आहेत का?” तसेच, “संजय राऊत म्हणतात तसे कोणी आणि किती पैसे घेतले हे मला माहिती नाही, ते संजय राऊतांनाच माहिती असेल; कारण माघार कोणी अशीच घेत नाही,” असे म्हणत राणेंनी राऊतांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपांना उपरोधिक उत्तर दिले.
अर्ज माघारीनंतर बाळ मानेंची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
बाळ माने यांनी मविआचे अधिकृत उमेदवार असतानाही अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाकरे सेनेत प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. पक्षाशी आणि महाविकास आघाडीशी गद्दारी केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळ माने यांच्यावर तातडीने कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी (Expelled) करण्यात आल्याची अधिकृत माहिती दिली.
कोण आहेत बाळ माने? (Who Is Bal Mane)
बाळ माने हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक परिचयाचे राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास खालीलप्रमाणे आहे:
- भाजपचे माजी आमदार: बाळ माने हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) असून, त्यांनी यापूर्वी रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
- २०२४ मध्ये ठाकरे गटात प्रवेश: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
- उदय सामंत यांच्याविरुद्ध लढत: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी रत्नागिरीतून महायुतीचे मंत्री उदय सामंत यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- २०२६ मधील नाट्यमय माघार: विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवूनही त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज मागे घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 05-06-2026














