Ratnagiri Crop Damage: अवकाळीने रत्नागिरीत ५२ हजार हेक्टरवरील आंबा-काजू खाक; २८ हजार बागायतदार संकटात

हेक्टरी ३ लाखांच्या उत्पन्नासमोर केवळ २२,५०० रुपयांची मदत; २ हेक्टरच्या जाचक मर्यादेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष

रत्नागिरी: जिल्ह्यात झालेल्या अवेळी व अवकाळी पावसामुळे नगदी पिके असलेल्या आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, प्राथमिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २८ हजार ९७५ शेतकरी या अवकाळीच्या तडाख्यामुळे पूर्णपणे बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू बागांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसल्याचे प्रशासकीय अहवालातून समोर आले आहे. एका बाजूला बागायतदारांना प्रतिहेक्टरी सुमारे ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, तर दुसऱ्या बाजूला शासनाकडून अवघ्या २२ हजार ५०० रुपयांची मदत दिली जाणार असल्याने, ही बागायतदारांची निव्वळ थट्टा असल्याची भावना आता कोकणातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

दोन महिन्यांच्या प्रक्रियेनंतर पंचनामे पूर्ण; ५२ हजार हेक्टर बाधित

यंदाच्या आंबा आणि काजू हंगामात लहरी हवामानाचा फटका कोकणच्या कृषी क्षेत्राला वारंवार बसला. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे आंबा व काजू पिकाला वारंवार फळधारणा झाली आणि ती गळून गेली. परिणामी, यंदा बागायतदारांच्या हाती केवळ २० ते ३० टक्केच पीक लागल्याने आधीच आर्थिक संकट ओढवले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा कृषी विभागामार्फत ही प्रक्रिया सुरू होती, जी काल अखेर पूर्ण झाली. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायतींमधून खातेदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

आंब्याचे ३१ हजार तर काजूचे २० हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित

कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण आंब्याचे क्षेत्र ३१ हजार ९९३ हेक्टर तर काजूचे क्षेत्र २० हजार १२ हेक्टर इतके आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही पिकांचे मिळून एकूण ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अतोनात नुकसानीमुळे जिल्ह्यातील २८ हजार ९७५ शेतकरी व बागायतदार आर्थिक कोंडीत सापडले असून, आता शासन बाधितांच्या पदरात प्रत्यक्षात किती निधी टाकणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

उत्पन्न ३ लाख अन् मदत फक्त २२,५००; बागायतदारांचा आक्रोश

सध्याच्या शासकीय निकषांनुसार, अवकाळी पावसामुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर केवळ २२ हजार ५०० रुपये भरपाई दिली जाते. त्यातही सर्वात जाचक अट म्हणजे ही मदत फक्त कमाल २ हेक्टरच्या मर्यादेतच अनुज्ञेय आहे. बागायतदारांच्या मते, आंबा पिकातून त्यांना हेक्टरी सरासरी ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नाचा आणि नुकसानीचा विचार केला तर हा आकडा सुमारे १५६ कोटी रुपयांच्या घरात जातो. त्यामुळे प्रत्यक्ष झालेले नुकसान आणि मिळणारी शासकीय मदत यात जमीन-अस्मानाची तफावत आहे. शासनाने ही मदतीची रक्कम वाढवून द्यावी आणि २ हेक्टरची जाचक मर्यादा तातडीने शिथिल करावी, अशी आग्रही मागणी आता जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

“शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्राथमिकदृष्ट्या ५२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही पुढील दोन दिवसांत शासनाकडे सादर करणार आहोत.” – शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 09-06-2026