स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरांना घातल्या बेड्या
लांजा (रत्नागिरी): तालुक्यातील कोत्रेवाडी येथील ‘झिमन्स काजू फॅक्टरी’त झालेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनचा कौशल्याने वापर करत पोलिसांनी दोन अट्टल चोरांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरलेल्या मालापैकी ४०० किलोहून अधिक काजू जप्त करण्यात आला आहे. कोकणातील सुक्या काजू चोरीची ही पहिलीच मोठी घटना असल्याने पोलीस यंत्रणेने या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने केला होता.
संशयाची सुई व्यापाऱ्यांकडे; अशी रचली तपासाची चक्रं
फॅक्टरीतून सुक्या काजूची चोरी झाल्याची तक्रार प्राप्त होता ही स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत ही चोरी या व्यवसायातील आणि फॅक्टरीच्या रचनेची पूर्वकल्पना असलेल्या जाणकार व्यक्तींनीच केली असावी, असा संशय पोलिसांना आला. या पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष भांगणे, हवालदार विजय आंबेकर, अमित कदम व दीपराज पाटील यांनी तातडीने फॅक्टरी मालकाकडून घाऊक (Wholesale) काजू खरेदी करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक गोळा केले.
मोबाईल लोकेशनने उघड केला चोरांचा माग
गुन्हे अन्वेषण शाखेने चोरी झालेल्या विशिष्ट कालावधीतील संशयित मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले. यामध्ये दोन संशयित व्यापाऱ्यांचे लोकेशन चोरीच्या वेळी फॅक्टरीच्या अगदी जवळ आढळून आले. संशय बळावल्यानंतर पोलिसांनी थेट कारवाई न करता एक नियोजनबद्ध सापळा रचला. पोलिसांनी काजू खरेदीदार व्यावसायिक बनून संशयितांशी मोठ्या प्रमाणावर काजू खरेदी करण्याच्या बहाण्याने संपर्क साधला.
९०० किलो चोरीची कबुली; पोलिसांच्या शिताफीचे कौतुक
माल खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरवून पोलिसांनी संशयितांना एका निश्चित ठिकाणी बोलावले. संशयित ठरलेल्या जागी पोहोचताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. शाहरूख मुराद साखरकर आणि वजीद मोहम्मद अजिज खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही याच फॅक्टरीतून घाऊक दराने काजू खरेदी करून इतर बाजारात विकायचे. त्यांनी फॅक्टरीतून सुमारे ९०० किलो काजू चोरल्याचे मान्य केले असून, त्यांच्याकडून ४०० किलोहून अधिक काजू जप्त करण्यात आला आहे. अत्यंत हुशारीने आणि तांत्रिक मदतीने हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 09-06-2026














