दुर्दैवी घटनेत आईचा मृत्यू तर बाप गजाआड; ५, ४ आणि २ वर्षांची तीन निष्पाप चिमुकली झाली पोरकी
मंडणगड (रत्नागिरी): तालुक्यात एका कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याची अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. तालुक्यातील कोंडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या अवघ्या २२ वर्षीय पत्नीवर कोयत्याने निर्घृण वार करून तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी, ६ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपी पतीला तातडीने अटक केली आहे.
घरासमोरील झाडाखालीच घडला थरार
या भीषण घटनेत वैशाली मंगेश पवार (वय २२, रा. कोंडगाव) या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. तर मंगेश नीलेश पवार (वय २५, रा. कोंडगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. या संदर्भात रामभाऊ सखाराम पवार (वय ६५, रा. कोंडगाव) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. फिर्यादीतील माहितीनुसार, संशयित आरोपी मंगेश हा गेल्या काही काळापासून पत्नी वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच वादातून शनिवारी दुपारी वैशाली घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली उभी असताना, मंगेशने तिच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर जखमी झालेल्या वैशालीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने कोंडगाव येथे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला, तसेच संशयित आरोपी मंगेश पवार याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. या प्रकरणी मंडणगड पोलिसांत गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
आई गमावली, बाप तुरुंगात; तीन चिमुकली उघड्यावर
या एका कौटुंबिक कलहामुळे आणि संशयाच्या भुतामुळे पवार कुटुंबातील तीन निष्पाप चिमुकल्यांचे छत्र एका झटक्यात हरवले आहे. मृत वैशाली आणि आरोपी मंगेश यांना अनुक्रमे ५ वर्षे, ४ वर्षे आणि अवघ्या २ वर्षांची तीन लहान मुले आहेत. यामध्ये दोन मोठ्या मुली असून सर्वात लहान २ वर्षांचा मुलगा आहे. आईचा अकाली मृत्यू आणि वडील पोलीस कोठडीत गेल्यामुळे ही तिन्ही लहान मुले आता पूर्णपणे अनाथ झाली आहेत. कोणत्याही वयात समज नसलेल्या या चिमुकल्यांचा यात काय दोष, असा जळजळीत प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 09-06-2026














