Ratnagiri Cyber Crime: सव्वा कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाजला नोएडामधून अटक

आरोपीकडून चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ओलीस ठेवून कोट्यवधींचा अपहार

रत्नागिरी: सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरीतील एका नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या धाकाने तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘Ratnagiri Cyber Crime’ च्या या अत्यंत क्लिष्ट गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याला पोलिसांनी दिल्ली-नोएडा परिसरातून शिताफीने अटक केली आहे. संशयित आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील धक्कादायक मोडस ऑपेरंडी (कार्यपद्धती) समोर आली असून, फसवणुकीची ही अवाढव्य रक्कम एका चॅरिटेबल ट्रस्टच्या बँक खात्यात वळवण्यात आली होती. आरोपींनी या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ‘सीएसआर डोनेशन’ (Corporate Social Responsibility) मिळवून देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशात बोलावून घेतले होते. तिथे या पदाधिकाऱ्यांना ओलीस ठेवून, त्यांच्याकडून बँक खात्यांची गोपनीय माहिती आणि धनादेश (चेक्स) बळजबरीने हस्तगत करण्यात आले. त्यानंतर या खात्यांचा गैरवापर करून १ कोटी ४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, रत्नागिरीतील फिर्यादी मकरंद जोशी यांना संशयित आरोपींनी फोन करून आपण वरिष्ठ पोलीस आणि सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्याद्वारे मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंगसारखे आंतरराष्ट्रीय गंभीर गुन्हे घडल्याची भीती त्यांना दाखवण्यात आली. इतकेच नव्हे तर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) करण्यात आली असून ते सतत पाळतext खाली आहेत, असे भासवून त्यांना घरातच कैद राहण्यास भाग पाडले. या कथित कायदेशीर कारवाईतून सुटका करण्यासाठी आणि ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून आरोपींनी जोशी यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये १ कोटी २३ लाख रुपये जमा करून घेतले होते.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ०२/२०२६ नुसार तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक खात्यांचे डिटेल्स आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास चक्रे फिरवली. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज हा नोएडा (उत्तर प्रदेश) येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने तिथे धाव घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात यापूर्वीही एका सहआरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

ही महत्त्वाची आणि धडक कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

नागरिकांसाठी सायबर पोलिसांचे जाहीर आवाहनकोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगून कोणी बँक खात्याची माहिती मागितल्यास किंवा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितल्यास घाबरून न जाता सावध राहावे. कायदेशीर प्रक्रियेत अशी कोणतीही ‘डिजिटल अटक’ नसते. अशा संशयास्पद कॉल्सवर विश्वास ठेवू नका आणि तात्काळ सायबर पोलीस ठाण्याच्या ८८३०४०४६५० या क्रमांकावर संपर्क साधावा. आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या महाराष्ट्र सायबर क्राईम हेल्पलाईनवर त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 09-06-2026