विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्चाला फाटा; सामाजिक परिवर्तनासाठी समाज बांधव सरसावले
खेड: कोकणातील बहुसंख्य समाज असलेल्या कुणबी समाजामध्ये लग्नविधी व अंत्यविधी संदर्भात अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी-परंपरांना अखेर फाटा देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. ‘Kunbi Parishad Khed’ अंतर्गत खेड तालुक्यातील भरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय जिल्हास्तरीय कुणबी परिषदेत या अनिष्ट प्रथांचे समूळ निर्मूलन करण्याचा ऐतिहासिक ठराव एकमताने संमत करण्यात आला. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा खेड, मुंबई व खेड ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या जुनाट रूढी-परंपरांमुळे समाजाचे मोठे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असल्याने अनेक दिवसांपासून या बदलांची आवश्यकता व्यक्त केली जात होती.
या परिषदेत समाजातील विवाह समारंभातील क्लिष्ट रूढी, परंपरा व चालीरीती तसेच मृत्यूंनंतरचे विधी आणि त्यामागील सामाजिक व धार्मिक पैलू यांवर विविध स्तरांतील मान्यवरांनी सखोल चर्चा केली. समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मूलनाबाबत राज्य शासनाने २२ मे २०२२ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला होता. त्या शासन निर्णयाला अनुसरून समाजाने व्यापक विचारविनिमय केला आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या परिषदेत घेण्यात आला. सामाजिक समारंभांवरील वाढता आणि अनावश्यक खर्च नियंत्रित करण्यासाठी समाज घटकांनी एकत्र येत काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत.
या संमत करण्यात आलेल्या ठरावांमध्ये प्रामुख्याने लग्न समारंभात मोठ्या आवाजातील ‘डीजे’ वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय आजकाल वाढलेले प्री-वेडिंग कार्यक्रम, विवाह सोहळ्यांमध्ये मांसाहार व मद्य देण्याची अनिष्ठ प्रथा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच ओटी भरण्यासाठी महागडी साडी देण्याची प्रथा बंद करणे आणि लग्न लागताना मंगलाष्टके म्हणताना तांदळाचा अपव्यय टाळून त्याऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे यांसारख्या अत्यंत पुरोगामी नियमांचा यात समावेश आहे.
या परिषदेदरम्यान शिवराज्य संघटना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते ॲड. रोशन पाटील यांनी विवाह समारंभातील विविध प्रथा, त्यांचे सामाजिक परिणाम आणि काळानुरूप आवश्यक असलेले बदल याविषयी समाज बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे यांनी मृत्यूंनंतरचे विधी, त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि अनावश्यक खर्च टाळून कशाप्रकारे समाजहित जपले जाऊ शकते, यावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. मुंबई शाखा सचिव संदीप दोडेकर, ग्रामीण खजिनदार सुधीर वैराग, ग्रामीण युवा अध्यक्ष सूरज जोगळे आणि महिला अध्यक्ष ममता भुवड यांनी दोन्ही विषयांवर प्रभावीपणे चर्चा घडवून आणली.
या भव्य समाज परिषदेला कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे केंद्रीय अध्यक्ष अनिल नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश मांडवकर, जि.प. सदस्य सचिन धाडवे, संघाचे सहसचिव माधव कांबळे, युवा सरचिटणीस सचिन रामाणे, कुणबी विवाह मंडळ सरचिटणीस राजेश मेटकर आणि शंकर बाईत यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत स्वागत्याध्यक्ष कृष्णा आग्रे यांनी केले, प्रास्ताविक खेड ग्रामीण शाखेचे सचिव सचिन गोवळकर यांनी मांडले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेड ग्रामीण शाखेचे सहसचिव बाळू सनगरे यांनी चोखपणे पार पाडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 09-06-2026














