कोकण रेल्वे भरतीच्या मुलाखती विशाखापट्टणमला; अन्याय निवारण समितीचा तीव्र विरोध

कोकणातील बेरोजगार तरुणांवर अन्याय; मुलाखती महाराष्ट्रातच घेण्याची शौकत मुकादम यांची मागणी

चिपळूण: कोकण रेल्वेने १३२ पदांच्या भरतीसाठी जाहीर केलेल्या नव्या परिपत्रकानुसार सुरू झालेल्या प्रक्रियेला आता स्थानिक स्तरावरून तीव्र विरोध सुरू झाला आहे. ‘Konkan Railway Recruitment’ अंतर्गत १४ मे रोजी काढलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, उमेदवारांच्या महत्त्वाच्या मुलाखती ८ जूनपासून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोकण रेल्वेच्या या धक्कादायक निर्णयाला कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने जाहीर विरोध दर्शवला असून, यामुळे कोकणातील स्थानिक बेरोजगार तरुणांवर मोठा अन्याय होत असल्याचा थेट आरोप समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केला आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या अधिकृत निवेदनात शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाच्या हेतूवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. कोकण रेल्वेची ही महत्त्वाची भरती प्रक्रिया थेट महाराष्ट्राबाहेर आणि तोही दक्षिण भारतात नेण्यामागे परप्रांतीय उमेदवारांना छुपे प्राधान्य देण्याचा रेल्वेचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या रेल्वेसाठी कोकणातील जनतेने जमिनी दिल्या, त्या कोकण रेल्वेच्याच नोकरभरतीसाठी मुलाखती महाराष्ट्राबाहेर घेण्याची नेमकी गरज काय, असा रोकडा सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

समितीने दिलेल्या निवेदनानुसार, यापूर्वी ज्या ज्या वेळी अशा प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवण्यात आल्या, त्या सर्व मुंबई, बेलापूर, मडगाव (गोवा) आणि रत्नागिरी या स्थानिक केंद्रांवरच पार पडल्या होत्या. त्यामुळे ही जुनी आणि सोयीची पद्धत मोडीत काढून उमेदवारांना लांबच्या राज्यात कशासाठी पाठवले जात आहे, यावरून तरुण वर्गात संताप आहे. महाराष्ट्रातील आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कोकणातील बेरोजगार युवकांना एवढ्या दूरच्या राज्यात जाऊन ऑफलाईन मुलाखत देणे आर्थिकदृष्ट्या तसेच प्रवासाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरणार आहे.

अन्याय निवारण समितीने रेल्वे प्रशासनाला गंभीर इशारा दिला असून, भरती प्रक्रिया महाराष्ट्राबाहेर राबवून स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय उमेदवारांना संधी देण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास, त्याला संघटनेतर्फे तीव्र संघर्षाने विरोध केला जाईल, असे मुकादम यांनी स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विशाखापट्टणम येथील मुलाखतींची केंद्रे तातडीने रद्द करावीत आणि ती कोकण विभागात किंवा महाराष्ट्रात निश्चित करावीत, अशी आग्रही मागणी समितीने केली आहे. या वादामुळे आता या १३२ पदांच्या भरती भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:32 09-06-2026