मालवण : सामान्यतः एप्रिल महिन्यात बाजारात येणारा हापूस आंबा यंदा दिवाळीच्या मुहुर्तावरच दिसू लागला आहे. आंबा प्रेमींसाठी ही एक महत्वाची आणि आनंददायक बातमी आहे.
मालवणमधील कुंभारमाठचे प्रसिद्ध आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांनी यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी थेट नाशिकला पाठविली आहे. विशेष म्हणजे या पेटीला तब्बल २५,००० रुपये दर मिळाला आहे.
उत्तम फोंडेकर आणि त्यांच्या भावांनी सलग चौथ्यांदा हापूस आंब्याची पहिली पेटी विक्री करण्याचा विक्रम केला आहे. बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि बुरशीच्या संसर्गाचा धोका असूनही त्यांनी आंब्याची योग्य काळजी घेतली. त्यामुळेच हा आंबा वेळेआधी पिकवून बाजारात उपलब्ध करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली असून, मालवण तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळविले आहे.
या पहिल्या पेटीत चार डझन देवगड हापूस आंबे होते. तेे नाशिकमधील एका ग्राहकाला थेट विकले गेले. दरवर्षी उन्हाळ्यातच हापूस आंब्याचा हंगाम सुरू होतो. मात्र या वेळी दिवाळीच्या पाडव्याच्या सणाच्या मुहुर्तावरच हा आनंदाचा क्षण आला आहे.
अजून तीन ते चार महिने आंब्याचा हंगाम सुरू होण्यास बाकी आहेत. मात्र फोंडेकर बंधूंच्या मेहनतीमुळे दिवाळीतच हापूस आंबा खाण्याचा अनुभव काही ग्राहकांना मिळाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:14 04-11-2024