रत्नागिरी जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रात ‘सी.सी.टी.एन.एस.’ प्रणाली कामकाजात प्रथम

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांच्या अहवालांची सी.सी.टी.एन.एस (Crime & Criminal Tracking Network & Systems) प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करणे, महिला व बालके यांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांची मुदतीत निर्गती करणे, सिटीझन पोर्टल वरील प्राप्त तक्रारींची तात्काळ निर्गती करणे, गुन्हे प्रकटीकरण, मिसींग व्यक्ती, अनोळखी मयत व्यक्ती यांच्या ओळखीबाबत जुळवणी तथा आरोपींचा पूर्व इतिहास बाबत पोलीस ठाणे स्तरावर चालणाऱ्या कामकाजावर पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथील सी.सी.टी.एन.एस कक्षा मार्फत देखरेख केली जाते.

अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे द्वारे दरमहा महाराष्ट्रातील सर्व पोलीस घटकांच्या सी.सी.टी.एन. एस प्रणालीच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येतो. या आढाव्या दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये सी.सी.टी.एन.एस कार्यप्रणालीचा वापर करून केलेल्या चांगल्या कामगिरीच्या आधारे गुणांकन केले जाते. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सप्टेंबर २०२४ च्या मासिक आढाव्यानंतर नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याने सी.सी.टी.एन. एस कार्यप्रणाली मध्ये २०१ गुणांपैकी १९८ गुण प्राप्त करुन ९८.५१ % गुणांसह राज्याच्या गुणांकात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी, सी.सी.टी.एन.एस प्रणाली, रत्नागिरी जिल्हा, श्रीमती जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.शा. रत्नागिरी श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा/१०१७ वैदेही विनोद कदम, सी.सी.टी.एन.एस कक्ष, रत्नागिरी तसेच सर्व पोलीस ठाण्यातील सी.सी.टी.एन.एस कामकाज करणारे पोलीस अंमलदार यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा सी.सी.टी.एन.एस कामगिरीचा आलेख उंचावला आहे.

तसेच मे व जुलै २०२४ या महिन्यां मध्ये देखील सी.सी.टी.एन.एस कामकाजामध्ये राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त करण्यात यश मिळविलेले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सी.सी.टी.एन.एस कार्यप्रणालीचा जास्त जास्त वापर करणाऱ्या सी.सी.टी.एन.एस कक्षातील सर्व पोलीस अंमलदार व जिल्ह्यातील पोलीस ठाणे स्तरावर सी.सी.टी.एन.एस कार्यप्रणालीचे कामकाज करणाऱ्या सर्व पोलीस अंमलदारांचे मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:19 PM 04/Nov/2024