मुंबई: राज्यातील लाखो तरुण ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या तलाठी भरती २०२६ संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महसूल व वनविभाग मंत्रालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून रिक्त पदांचा तपशील तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आगामी काही दिवसांत तलाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महसूल विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण पत्र
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग मंत्रालयाने सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र धाडले आहे. या पत्रानुसार, शासन निर्णय दि. ०२.०४.२०२६ अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. या नवीन आकृतीबंधानुसार ‘ग्राम महसूल अधिकारी’ (तलाठी) संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरली जाणार आहेत.
८ मे पर्यंतची मुदत आणि पुढील प्रक्रिया
शासनाने ही प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत:
- बिंदू नामावली तपासणी: सर्व जिल्ह्यांनी आपल्याकडील रिक्त पदांची ‘बिंदू नामावली’ मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे अनिवार्य आहे.
- मागणीपत्र सादर करणे: ज्या जिल्ह्यांमध्ये ‘पेसा’ (PESA) क्षेत्र लागू आहे, त्यांनी पेसा आणि बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र तयार करावे.
- अंतिम मुदत: ही सर्व माहिती आणि मागणीपत्र विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाला ०८ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
MPSC मार्फत होणार भरती?
पत्रातील माहितीनुसार, ही मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर केली जाणार आहेत. त्यामुळे यंदाची तलाठी भरती प्रक्रिया आयोगामार्फत राबवली जाण्याची दाट शक्यता आहे. ८ तारखेपर्यंत माहिती प्राप्त झाल्यानंतर, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
पंचायत स्तरावरील प्रशासकीय कामात तलाठी हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून या भरतीसाठी सरकारवर दबाव होता, अखेर सरकारने पावले उचलल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:08 09-05-2026














