Ratnagiri Agriculture News: रत्नागिरीत पावसाची उसंत; रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग

जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १३.६१ मि.मी. पाऊस; पेरणी केलेल्या बियाणांना जीवदान

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असे वाटत असतानाच मागील चोवीस तासांत पावसाने अचानक उसंत घेतली आहे. (Ratnagiri Agriculture News) गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतात पाणी साचले होते, मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातील रखडलेल्या शेतीच्या कामांना, विशेषतः नांगरणीला जोरदार वेग आला आहे. पावसाच्या या लपंडावामुळे शेतकऱ्यांची शेतातील लगबग कमालीची वाढली आहे.

जिल्ह्यात कुठे किती पाऊस? (मागील २४ तासांतील आकडेवारी)

जिल्ह्यात मागील २४ तासांत अवघ्या सरासरी १३.६१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असून तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • सर्वाधिक कमी पाऊस: खेड (०.८० मि.मी.) आणि चिपळूण (०.१० मि.मी.)
  • मध्यम पाऊस: मंडणगड (६.२० मि.मी.), दापोली (५.५० मि.मी.), लांजा (११.१० मि.मी.) आणि राजापूर (११.३० मि.मी.)
  • सर्वाधिक पाऊस: गुहागर (२२.८० मि.मी.), संगमेश्वर (१८.१० मि.मी.) आणि रत्नागिरी (४४.२० मि.मी.)

जिल्ह्यात एकूण १२२.५० मि.मी. पावसाची नोंद झाली असून १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ८.९८ मि.मी. अवघ्या पावसाची नोंद झाली आहे.

धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ आणि पिकांना जीवदान

गेल्या तीन-चार दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न आणखी काही दिवसांसाठी सुटला असून प्रशासनावरील ताण हलका झाला आहे. तसेच, सुरुवातीला कडक उन्हामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. आधी पेरणी केलेल्या बियांनी आता जमिनीत चांगला तग धरला असून, रोपांची वाढ जोमाने होऊ लागली आहे. तीव्र उन्हामुळे रोपे करपण्याचा असणारा मोठा धोका या पावसामुळे पूर्णपणे टळला आहे.

वातावरणात गारवा; नांगरणी अंतिम टप्प्यात

सलग काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीच्या संपूर्ण वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून उन्हाळ्यातील उष्णतेचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. पाऊस आणखी काही दिवस सातत्य राखेल अशी आशा असतानाच आता उघडीप मिळाल्याने शेतकऱ्यांनी या वेळेचा पुरेपूर फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरीतील नाचणे गुरुमळी परिसरासह ग्रामीण भागात सध्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने शेतीची नांगरणी अंतिम टप्प्यात आणण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 27-06-2026