विद्यार्थ्यांना ३० पर्यंत पाढे तोंडपाठ हवेत! अतिरिक्त तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करा; शिस्तीचे आदेश
रत्नागिरी:
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण न देता जास्तीत जास्त ऑफलाइन शिक्षणावर (Offline Education) भर द्यावा. गरज भासल्यास शिक्षकांनी अतिरिक्त तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंदे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती विलास चाळके, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तासिकेच्या वेळी मोबाईल नको; पाठांतरावर भर द्या!
बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या मांडल्या. त्यावर भाष्य करताना अध्यक्षांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना तासिकेच्या वेळी मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन केले.
- ३० पर्यंत पाढे तोंडपाठ हवेत: विद्यार्थ्यांना ३० पर्यंतचे पाढे पाठ झालेच पाहिजेत. त्यासाठी तासिका सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून पाढ्यांचे पाठांतर करून घ्यावे आणि त्यांना पाठांतराची सवय लावावी.
- शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी: शिष्यवृत्ती परीक्षेच्या मार्गदर्शनासाठीही ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीनेच विशेष तासिका घेण्यात याव्यात.
आरोग्य विभागाला सूचना: सर्पदंशावर लस ठेवा सज्ज!
पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाच्या (Snake Bite) घटनांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.
यावर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (PHC) सर्पदंशावरील आवश्यक इंजेक्शन्स व लस मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. तसेच, सर्पदंश झालेल्या रुग्णावर तात्काळ प्राथमिक उपचार करून त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात हलवावे, असे निर्देशही देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 12-08-2026














