Gatari Amavasya Ratnagiri: गटारीला खवय्यांनी मटण, चिकन आणि मासळीवर मारला ताव; रत्नागिरीत मांसाहार विक्रीत मोठी वाढ

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मटण दुकानांबाहेर रांगा; हॉटेल्ससह निसर्गरम्य ठिकाणी रंगल्या पार्ट्या


रत्नागिरी:

Gatari Amavasya Ratnagiri साजरी करण्यासाठी आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी रत्नागिरी शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात खवय्यांची अभूतपूर्व गर्दी पाहावयास मिळाली. गुरुवारपासून पवित्र श्रावण महिना सुरू होत असल्याने, आषाढाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारप्रेमींनी मटण, चिकन आणि विविध प्रकारच्या मासळीवर ताव मारला. गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासूनच मटण व चिकनच्या दुकानांसह मच्छी मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

मटण ९०० रुपये किलो तर चिकन ३२० रुपयांवर
वाढती मागणी लक्षात घेता मटण व चिकन विक्रेत्यांनी आदल्या दिवसापासूनच अतिरिक्त बोकडांची आणि पक्ष्यांची व्यवस्था केली होती. काही दुकानांमध्ये नेहमीपेक्षा २५ ते ३० बोकड जास्त मागवण्यात आले होते. सध्या रत्नागिरीत मटणाचा दर ९०० रुपये प्रति किलो तर चिकनचा दर ३२० रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे. दरात वाढ झालेली असूनही ग्राहकांच्या उत्साहात कोणतीही घट झालेली दिसली नाही.

हॉटेल्स आणि पर्यटन स्थळांवर रंगल्या पार्ट्या
श्रावण महिन्यात अनेक कुटुंबांमध्ये महिनाभर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला जातो. त्यामुळे गटारीच्या निमित्ताने घरोघरी विशेष बेत आखण्यात आले होते. याशिवाय शहरातील हॉटेल्स, ढाबे आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर मांसाहारी पार्ट्यांचे दणदणीत आयोजन करण्यात आले. स्थानिक नागरिकांसोबतच कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनीही या पार्ट्यांचा आनंद घेतला.

मद्यविक्रीतही मोठी वाढ
गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मांसाहारासोबतच मद्यविक्रीतही मोठी वाढ नोंदवली गेली. दारू महागली असली तरी देशी दारूपासून ते विदेशी ब्रँडपर्यंत सर्व प्रकारच्या दारूची विक्रमी विक्री झाली. वाईन्स शॉप्स आणि परमिट रूम्समध्ये संध्याकाळच्या वेळी गर्दी पाहावयास मिळाली, तर अनेकजण मोकळ्या जागांवर पार्ट्या आयोजित करताना दिसून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 13-08-2026