सांगलीच्या मनीषा कदम यांच्या हाती प्राथमिक शिक्षण विभागाची धुरा; येत्या सोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता
रत्नागिरी:
Ratnagiri ZP Education Officer Manisha Kadam यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची गेल्या कित्येक महिन्यांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रत्नागिरीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी सांगलीच्या मनीषा न्याणू कदम यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या सोमवारी त्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याची दाट शक्यता आहे.
१३ परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांच्या पदस्थापना
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या १३ परिवीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या खातेनिहाय जिल्हा संलग्नता टप्प्यात स्वतंत्र पदभार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाच्या सुधारित वेळापत्रकानुसार या १३ अधिकाऱ्यांना १७ ऑगस्ट २०२६ ते १३ मार्च २०२७ या ३० आठवड्यांच्या कालावधीसाठी संबंधित पदांचा स्वतंत्र पदभार सोपवण्यात आला आहे. याच निर्णयांतर्गत मनीषा कदम यांची रत्नागिरी जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
प्रदीर्घ काळानंतर मिळाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी
मागील कित्येक महिन्यांपासून रत्नागिरी जि. प. चे प्राथमिक शिक्षणाधिकारी पद प्रभारींवरच चालवले जात होते. यापूर्वी नीलिमा नाईक आणि सुनिता शिरभाते यांनी हे पद सांभाळले होते, तर अलिकडेच प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून किरण लोहार यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोहार यांनी पदभार स्वीकारून चारच दिवस झाले होते व विभागाची घडी बसवण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, शासनाच्या नव्या आदेशानुसार आता सांगलीच्या मनीषा कदम यांची पूर्णवेळ प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी वर्णी लागली आहे.
प्रशासकीय कामकाजाला मिळणार नवी दिशा
मनीषा कदम यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाला नवी गती आणि नेतृत्व मिळणार आहे. संबंधित परिवीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना पदाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व प्रशासकीय सूचना देण्याचे निर्देशही राज्य शासनाने जारी केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 13-08-2026














