Lanja Road Accident: दुचाकीला रानटी डुकराची जोरदार धडक; गंभीर जखमी आसगे येथील व्यक्तीचा प्रदीर्घ उपचारांनंतर मृत्यू

धुंदरे गावाजवळ झाला होता भीषण अपघात; जिल्हा शासकीय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

लांजा: ‘Lanja Road Accident’ मधील एका गंभीर अपघातग्रस्त व्यक्तीचा प्रदीर्घ उपचारांनंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्याने दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक समोर आलेल्या रानटी डुकराच्या भीषण धडकेमुळे ते गंभीर जखमी झाले होते. दिनकर सखाराम मांडवकर (वय ५३, रा. आसगे, मांडवकरवाडी, ता. लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या निधनाने आसगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कलिंगड विक्री करून घरी परतताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर मांडवकर हे लांजा बाजारपेठ येथून कलिंगड विक्रीचा व्यवसाय आटपून आपली दुचाकी (क्रमांक एमएच ०८ ए एव्ही ७५४९) घेऊन आसगे येथील घराकडे परतत होते. धुंदरे गावाच्या हद्दीतील बेणी नदीच्या पुलापुढील वळणावर ते आले असता, अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपातून एक रानटी डुक्कर त्यांच्या दुचाकीसमोर आले. डुकराने मारलेल्या जोरदार धडकेमुळे मांडवकर हे दुचाकीवरून थेट रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली.

विविध रुग्णालयांत प्रदीर्घ उपचार

अपघाताची ही घटना घडल्यानंतर दिनकर मांडवकर यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने लांजा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही काळासाठी लांजा येथील स्वामी समर्थ रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रदीर्घ उपचारांनंतरही प्रकृतीत पुरेशी सुधारणा न झाल्याने आणि ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने शेवटी त्यांना आसगे येथील घरी आणून घरगुती उपचार सुरू ठेवले होते.

संसर्ग झाल्याने प्रकृती खालावली आणि मृत्यू

घरी उपचार सुरू असतानाच अचानक त्यांना लघवीच्या जागी संसर्ग (इन्फेक्शन) झाल्याने त्यांची प्रकृती कमालीची खालावली. कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा तातडीने रत्नागिरीतील चिरायू रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले असून, वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे झालेल्या या अपघाताबाबत चिंता व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 30-06-2026