रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाट परिसरात नुकतीच दरड कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराची माती आणि एक मोठा ओंडका थेट महामार्गावर आल्याने, त्यावर आदळून एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नसली, तरी निवळी घाटातील वाहतूक आणि प्रवाशांची सुरक्षा सध्या कमालीची चिंताजनक बनली आहे.
पावसामुळे धोका वाढला; रस्ता बंद होण्याची भीती
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील डोंगराचे कडे सैल झाले आहेत. त्यामुळे सध्या येथील माती आणि दगड हळूहळू रस्त्यावर येत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास, एखादी मोठी दरड कोसळून महामार्ग पूर्णपणे ठप्प होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच वेगवान वाहनांवर दरड कोसळल्यास मोठा अपघात घडण्याची भीती वर्तवली जात आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
नेमकी त्याच ठिकाणी दुर्घटना!
धक्कादायक बाब म्हणजे, निवळी घाटात पोलिसांनी संभाव्य अपघात टाळण्यासाठी ज्या ठिकाणी ‘झिगझॅग’ (Zig-Zag) व्यवस्था केली आहे, अगदी त्याच भागात ही दरड कोसळली आहे. दरडीची चिकट माती रस्त्यावर पसरत असल्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या वाहनांना या घसरगुंडीचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका अधिकच गडद झाला आहे.
प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज
निवळी घाटातील ही बिकट परिस्थिती पाहता, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महामार्ग प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे येथे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील माती तात्काळ हटवून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घाटात चोवीस तास खबरदारीची यंत्रणा तैनात करावी, अशी मागणी आता प्रवाशांमधून आणि स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 30-06-2026














