अभिजित पड्याळ व प्रसाद देवस्थळी यांचा रत्नदुर्ग माउंटेनियर्स वॉकर्स ग्रुपतर्फे सत्कार
रत्नागिरी:
रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रातील दोन यशस्वी धावपटू, श्री. अभिजित पड्याळ आणि श्री. प्रसाद देवस्थळी यांचा जागतिक स्तरावरील ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’मधील कामगिरीबद्दल आणि क्रीडा पर्यटनातील योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. रत्नदुर्ग माउंटेनियर्स आणि वॉकर्स ग्रुप, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्कार सोहळ्यात रत्नागिरीकरांनी या दोन्ही ‘कोकणच्या हिऱ्यां’चे कौतुक केले.
दक्षिण आफ्रिकेतील ९९ वर्षांची परंपरा असलेली जगप्रसिद्ध अल्ट्रा मॅरेथॉन, ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ श्री. अभिजित पड्याळ यांनी अवघ्या ९ तास ५१ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केली. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना मानाचा ‘रॉबर्ट मशाली मेडल’ प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर, श्री. प्रसाद देवस्थळी यांनी सलग दुसऱ्यांदा ही प्रतिष्ठित मॅरेथॉन पूर्ण करून रत्नागिरीचे नाव जागतिक नकाशावर उंचावले आहे. केवळ धावपटू म्हणूनच नव्हे, तर ‘सुवर्णसूर्य फाउंडेशन’च्या माध्यमातून कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा यांसारखे उपक्रम राबवून कोकणात क्रीडा पर्यटन रुजवण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात रत्नदुर्ग माउंटेनियर्सचे अध्यक्ष श्री. वीरेंद्र वणजू, उपाध्यक्ष सौ. नेत्रा राजे शिर्के, सौ. योगिता वणजू, श्री. नित्यानंद भुते,गौतम bashte,जितेंद्र शिंदे, गणेश चौगुले, पराग सुर्वे आणि वॉकर्स ग्रुपचे श्री. महेश गुंदेजा, उद्योजक तुषार खानविलकर, निलेश शाह, विनय जांगले , संजय मुटगर, आशिष भालेकर, मिलिंद मिरकर, नितीन लाखन यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सत्कारमूर्तींनी उपस्थित क्रीडाप्रेमींना प्रोत्साहित केले. रत्नागिरीत राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर जागतिक दर्जाची कामगिरी कशी साध्य करता येते आणि क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
या गौरव सोहळ्याला रत्नदुर्ग माउंटेनियर्स व वॉकर्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणातील या धावपटूंच्या यशाने रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 30-06-2026














