बेन स्टोक्सची तडकाफडकी निवृत्ती!

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण जगाला आश्चर्यचकीत केले. स्टोक्सच्या या निर्णयानंतर त्याच्या सहकारी जो रूट भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

“बेन स्टोक्ससारखे खेळाडू पिढीतून एकदाच जन्माला येतात”, अशा शब्दांत जो रूटने आपल्या भावना व्यक्त केल्या.

न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टोक्सने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय जाहीर केला. यावर बोलताना जो रूटने स्टोक्सच्या नेतृत्वगुणांचे, लढाऊ वृत्तीचे आणि संघासाठी नेहमी झोकून देण्याच्या स्वभावाचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला की,”बेन स्टोक्स हा पिढीतून एकदाच जन्माला येणारा खेळाडू आहे. त्याच्यासारखा क्रिकेटपटू पुन्हा पाहायला मिळणे अत्यंत कठीण आहे. त्याने मैदानावर जे योगदान दिले, ते शब्दांत मांडणे अशक्य आहे.”

स्टोक्सने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यातील त्याची खेळी, अॅशेस मालिकेतील ऐतिहासिक डाव आणि कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅझबॉल’ शैलीला नवी ओळख मिळवून देण्यात त्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. २०२२ पासून इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना त्याने आक्रमक आणि निर्भीड क्रिकेटची नवी दिशा दाखवली.

इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार कोण?

स्टोक्सच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या पुढील कसोटी कर्णधारपदाबाबत चर्चांना वेग आला आहे. स्वतः स्टोक्सने उपकर्णधार हॅरी ब्रूक याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याचे समर्थन केले असून, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्कलमनेही पुढील कर्णधार निवडताना विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. बेन स्टोक्सच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाल्याची भावना क्रिकेटविश्वातून व्यक्त होत असून, त्याच्या लढाऊ वृत्ती, नेतृत्व आणि संस्मरणीय खेळी क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:19 30-06-2026