Mumbai-Goa Highway: परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका; गुहागर बायपास येथेही दरड कोसळली

Mumbai-Goa Highway वरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पावसामुळे संरक्षक भिंतीच्या पायाची माती वाहून गेली

चिपळूण:

गेल्या सलग चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाटातील गॅबियन वॉलला मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेली ही गॅबियन वॉल आता अत्यंत असुरक्षित बनली असून, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सलगच्या पावसामुळे या भिंतीच्या पायाची माती पूर्णपणे वाहून गेली असून काही ठिकाणी भिंतीला मोठे तडे देखील गेले आहेत.

कामाच्या दर्जाबाबत शंका; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

परशुराम घाटातील या परिस्थितीमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत आता गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली संरक्षक भिंत पहिल्या काही दिवसांच्या पावसातच कमकुवत झाल्याने प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, घटनास्थळाची पाहणी करून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

गुहागर बायपास रोडवर पाण्याच्या टाकीजवळ दरड कोसळली

दुसऱ्या बाजूला, चिपळूण शहरातील गुहागर बायपास रोडवर पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी रात्री अचानक दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत डोंगराचा मोठा भाग आणि मोठे दगड खाली कोसळले. सुदैवाने, कोसळलेली दरड आणि दगड थेट मुख्य रस्त्यावर न आल्याने महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. मात्र, या दोन्ही घटनांमुळे पावसाळ्यात चिपळूण आणि आसपासच्या डोंगराळ भागातील प्रवास अधिक धोकादायक बनला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 02-07-2026