चिपळूण: Chiplun Postal Division:
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी आणि टपाल सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आजपासून स्वतंत्र ‘चिपळूण डाक विभाग’ अधिकृतपणे कार्यान्वित झाला आहे. १ जुलै रोजी गोवा परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पाटील यांच्या हस्ते फित कापून आणि कोनशिला अनावरण करून या नवीन विभागाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या ऐतिहासिक निर्णयामुळे उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांमधील लाखो ग्राहकांना आता स्थानिक पातळीवरच टपाल आणि आर्थिक सेवांचा लाभ घेता येणार आहे.
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या या चिपळूण डाक विभागामध्ये उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, दापोली, खेड, गुहागर आणि मंडणगड या पाच प्रमुख तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पाचही तालुक्यांमधील सर्व उप आणि मुख्य डाकघरे आता थेट चिपळूण विभागाला जोडली गेली आहेत. यापूर्वी प्रशासकीय मंजुरी, अधिकृत कामे किंवा तक्रार निवारणासाठी या भागातील नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना थेट जिल्हा मुख्यालय असलेल्या रत्नागिरीला जावे लागत असे. आता ही सर्व कामे चिपळूण येथेच मध्यवर्ती ठिकाणी आणि जलदगतीने होणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी बोलताना पोस्टल सेवा संचालक रमेश पाटील म्हणाले की, “नवा चिपळूण विभाग पूर्णपणे जनतेच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आला आहे. टपाल खात्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे जनतेचे सेवक म्हणून काम करतात. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामकाजात गतिमानता आणि अचूकता राखणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांना सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर रीतीने टपाल खात्याच्या सर्व योजना व सेवा मिळाव्यात, हाच या विभाजनाचा मुख्य उद्देश आहे.” या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दापोलीतून झाल्याचे सांगत कोकणातील नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित केले.
या नव्या रचनेमुळे केवळ ग्राहकांचीच सोय होणार नसून, टपाल विभागाच्या अंतर्गत प्रशासकीय कामांनाही वेग येणार आहे. स्थानिक स्तरावर मुख्य कार्यालय आल्यामुळे तक्रारींचे निवारण तातडीने होईल आणि शासकीय योजनांचा विस्तार ग्रामीण भागात वेगाने करणे शक्य होईल. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांच्या दृष्टीनेही हा विभाग सोयीचा ठरणार असून, कर्मचाऱ्यांना आपल्याच भागात राहून सेवा देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या सोहळ्यादरम्यान विमा कलेक्शन (PLI/RPLI) आणि नवीन आर्थिक वर्षात सर्वाधिक टपाल खाती उघडणाऱ्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदक, प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक पोस्टल सेवा संचालक संदीप कडगावकर, रत्नागिरी डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, नगरसेविका रसिका देवळेकर, प्रयास फाउंडेशनच्या अध्यक्ष रवीना गुजर यांच्यासह जिल्ह्यातील विविध टपाल कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक डाकघर अधीक्षक अजय कदम यांनी केले, तर दिलीप बेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 02-07-2026














