Khed Road Damage: खेडमधील १० लाखांचा रस्ता काही महिन्यांतच खचला; कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांचे गंभीर प्रश्न

दोन हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

खेड:

खेडमधील १० लाखांचा रस्ता अवघ्या काही महिन्यांतच खचू लागल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आणि भरणे गावाच्या हद्दीवर समोर आली आहे. भरणे बाईतवाडी येथून शाळेकडे जाणारा हा मार्ग खचल्यामुळे सुमारे दोन हजार शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत, या भ्रष्टाचाराला आणि निष्काळजीपणाला नेमके जबाबदार कोण, असा थेट प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.

अवघ्या काही महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था

भरणे बाईतवाडी येथून शाळेकडे जाणाऱ्या या मार्गावरून दररोज शेकडो वाहने आणि हजारो विद्यार्थी ये-जा करतात. ग्रामपंचायतीमार्फत नागरी सुविधा २०२५-२६ योजनेअंतर्गत २१ नोव्हेंबर २०२५ रोजी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. सुमारे १९३ मीटर लांबीच्या या कामासाठी शासनाचे १० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, या कामामध्ये केवळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. रस्त्याच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेली बाजूपट्टी (शोल्डर) मजबूत करण्याचे काम योग्य प्रकारे करण्यात आले नाही.

पावसाच्या सुरुवातीलाच रस्ता बनला मृत्यूचा सापळा

कामामध्ये झालेल्या हलगर्जीपणामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या कडा वेगाने खचू लागल्या आहेत. परिणामी, संपूर्ण मार्ग सध्या अत्यंत धोकादायक बनला असून, विशेषतः शालेय बस, रिक्षा यांसारखी शालेय वाहने आणि दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ठेकेदाराला मोबदला मिळाला, मग कामाची चौकशी कधी?

दरम्यान, या निकृष्ट दर्जाच्या कामाचा संबंधित ठेकेदाराला पूर्ण मोबदला अदा करण्यात आल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे या कामाची गुणवत्ता, तांत्रिक तपासणी आणि अंतिम मोजमाप (Measurement) करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक निधीचा वापर करून केलेले काम एवढ्या कमी कालावधीत निकृष्ट ठरत असेल, तर त्याची अंतिम जबाबदारी कोणाची, असा रोकडा सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 02-07-2026