अणुसरे येथील श्री सिद्धिविनायक विद्यालयातील वर्ग बंद पडल्याने पालक आक्रमक; सभापतींना निवेदन
राजापूर (रत्नागिरी):
Anusare School Protest | राजापूर तालुक्यातील अणुसरे येथील श्री सिद्धिविनायक विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग शिक्षकांअभावी अचानक बंद पडले आहेत. या गंभीर समस्येमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी आज राजापूर पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शिक्षक नेमण्यात यावेत आणि शाळा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पंचायत समिती सभापती नंदिनी कदम यांना निवेदन सादर केले. तसेच तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनाही या संदर्भातील निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी सर्व शिक्षकांच्या बदल्या; नवीन नियुक्ती शून्य
चालू शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी अणुसरे गावातील नागरिकांना शाळेतील सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली. मात्र, महिना उलटून गेला तरी त्यांच्या जागी अद्याप एकाही नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शिक्षकांविना वर्ग कुलूपबंद असल्याने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन महत्त्वाच्या वर्षात अभ्यासाचा बट्ट्याबोळ होत असल्याने पालकांचा संयम सुटला असून त्यांनी थेट प्रशासकीय कार्यालया पायऱ्या चढण्याचा निर्णय घेतला.
तीन दशकांचा दैदिप्यमान इतिहास; हजारो विद्यार्थी उच्च पदावर
सुमारे ३० वर्षांपूर्वी अणुसरे गावात प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणासाठी विशेष बाब म्हणून या माध्यमिक शाळेची स्थापना करण्यात आली होती. त्या काळी गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने अनेक मुलींना सातवी नंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेल्या या शाळेने गेल्या तीन दशकांत मोलाचे योगदान दिले आहे. या शाळेतून शिकलेले हजारो विद्यार्थी आज डॉक्टर, नर्स, अभियंते, वकील, शिक्षक, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सैनिक म्हणून देशसेवेत कार्यरत आहेत. शाळेचा दहावीचा निकालही अनेक वेळा १०० टक्के लागल्याचा सार्थ उल्लेख ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे.
५ किमी परिसरात पर्याय नाही; दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर
अणुसरे गावापासून जवळपास पाच किलोमीटरच्या परिसरात दुसरी कोणतीही माध्यमिक शाळा उपलब्ध नाही. त्यामुळे जर ही शाळा कायमस्वरूपी बंद झाली, तर विद्यार्थ्यांचे, विशेषतः मुलींचे शिक्षण पुन्हा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचसोबत गावातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही यामुळे अत्यंत गंभीर बनला आहे. यामुळे शासनाने या संवेदनशील विषयावर तात्काळ आणि सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात ढकलले जाऊ नये, यासाठी शासनाने कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत, पालक, विद्यार्थी आणि समस्त ग्रामस्थांनी केली आहे. या मोर्चादरम्यान पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, पंढरीनाथ मयेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 03-07-2026














