मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्याहितासाठी प्राधान्य देत प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून होत असलेली मुदतवाढीची मागणी आणि प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २ जुलै २०२६ होती. अंतिम मुदतीपर्यंत राज्यभरातून १ लाख ६१ हजार ७८६ उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ३२ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी आवश्यक शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन अर्ज भरणे, शुल्क भरणे तसेच तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित मुदतीत अर्ज पूर्ण करता आला नव्हता. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अर्ज भरण्यासाठी ही अखेरची संधी उपलब्ध करून दिली आहे.
राज्य शासन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करत असताना राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवेश प्रक्रियेत कोणताही पात्र विद्यार्थी केवळ मुदतीअभावी वंचित राहू नये, हा शासनाचा स्पष्ट दृष्टिकोन असून त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
इच्छुक विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेत दि. ६ जुलै २०२६ पर्यंत आपला अर्ज निश्चित करावा, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या कॅप फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक, प्रवेश नियमावली, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज निश्चित करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:32 03-07-2026














