गणपतीपुळ्यात पावसाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावर; दुकाने धोक्यात, पर्यटक त्रस्त

‘आपटा तिठा ते शासकीय विश्रामगृह’ मार्गावरील चुकीच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर साचले पाणी; ग्रामपंचायतीचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

गणपतीपुळे: प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरणातील त्रुटी आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उघड झाल्या आहेत. रस्त्यावरील पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक ते पाईप न टाकल्यामुळे पावसाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावरील दुकानांमध्ये साचू लागले आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि देशभरातून येणारे पर्यटक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने पाईप टाकण्याची मागणी केली आहे.

चुकीच्या काँक्रीटीकरणामुळे पाण्याचा निचरा ठप्प

मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीपुळे येथील ‘आपटा तिठा ते शासकीय विश्रामगृह’ या महत्त्वाच्या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले होते. हे काम करताना पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जागा तर ठेवण्यात आली होती, मात्र त्या ठिकाणी पाणी पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले पाईप्स बसवण्यात आले नाहीत. परिणामी, पावसाचे पाणी पुढे जाण्याऐवजी तिथेच साचून राहत आहे आणि रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये घुसत आहे. यामुळे येथील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

मुख्य मंदिर मार्गावर पाणी साचण्याची भीती; भाविकांना मनस्ताप

पावसाचा जोर जसा वाढेल, तसे हे साचलेले पाणी थेट श्री गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास वाहतूक पूर्णपणे कोलमडेल आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे देशभरातून येणाऱ्या हजारो पर्यटकांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो.

ग्रामपंचायतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

या गंभीर समस्येची दखल घेत ग्रामपंचायत गणपतीपुळे ने १२ जून रोजीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना एक अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पाणी निचरा होण्यासाठी तातडीने पाईप टाकण्याची मागणी केली आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाईल आणि त्याचा थेट फटका स्थानिक स्टॉलधारक तसेच पर्यटकांना बसेल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कधी कारवाई करणार, की संपूर्ण पावसाळा गणपतीपुळेकर आणि पर्यटकांना पाण्यातूनच वाट काढावी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 04-07-2026