भावेआडमवरून रत्नागिरीकडे येणाऱ्या बसवरील ताबा सुटल्याने झाली होती धडक
रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजीकच्या शिळ-पवारवाडी स्टॉप येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दोन एसटी बसच्या भीषण अपघात प्रकरणी संशयित एसटी चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वलीखान गुलाबखान पठाण (वय ३७, मूळ रा. धनगर तकली, ता. पूर्णा, जि. परभणी; सध्या रा. महालक्ष्मी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित एसटी चालकाचे नाव आहे.
ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी सातच्या सुमारास शिळ-पवारवाडी स्टॉप येथे घडली होती. या अपघातात स्वतः चालकासह एकूण १२ महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले होते.
ताबा सुटल्याने समोरासमोर झाली होती धडक
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संशयित चालक वलीखान पठाण हे एसटी बस (क्रमांक: MH-14 BT 2231) घेऊन गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता भावेआडम येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होते. प्रवास दरम्यान सकाळी सातच्या सुमारास शिळ-पवारवाडी रस्त्यावर आले असता, चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ही बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला अत्यंत जोरात धडकली. या अपघातामध्ये एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, तसेच बसमधील प्रवास करणारे १२ महाविद्यालयीन विद्यार्थी किरकोळ व गंभीर जखमी झाले होते.
महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
या अपघात प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अमिता पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित एसटी चालक वलीखान पठाण याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास शहर पोलीस अंमलदार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 04-07-2026














