मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांतील वीज वितरण, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करावीत असे निर्देया ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या
दापोली येथील उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. यासाठी सकारात्मक प्रस्ताव पाठवावा. तसेच समुद्र किनाऱ्या जवळील जुन्या वीज वाहक लाईन रस्त्यालगत घेण्याबाबत राज्यमंत्री योगेश कदम यांनी सूचित केले.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांतील ऊर्जा विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस गृह राज्यमंत्री योगेश कदम, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढीकर संचालक डी. व्ही. पडळकर, सतीश चव्हाण, कोकण विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक जगदाळे, मुख्य अभियंता डोळे आणि कावळे यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, दापोली, खेड, मंडणगड तालुक्यात वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेली कामे, नवीन उपकेंद्रे, उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांची उभारणी, रोहित्रांची उपलब्धता, कृषी व घरगुती वीज जोडण्यांशी संबंधित प्रकरणे तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध मागण्या संवेदनशीलतेने हाताळून ही कामे विनाविलंब पूर्ण करावीत.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, या भागात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यावर तातडीने उपाययोजना कराव्या. आवश्यक तेथे कव्हर कंडक्टर लावण्याची कार्यवाही करावी. नागरिकांना सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास राज्य शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 04-07-2026














