तासाआड वीज खंडित; व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
राजापूर: राजापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महावितरणच्या देखभाल आणि दुरुस्तीतील निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्याना बसत असून, महावितरणच्या या ढिसाळ कारभाराविरोधात संपूर्ण तालुक्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Rajapur Power Outage Updates: तासाआड वीज खंडित; व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
राजापूर शहरात गेल्या चार दिवसांपासून सलग अर्धा ते एक तासाच्या अंतराने वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक भागांत तर २० ते २४ तासांच्या कालावधीत वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिकांचे आणि विशेषतः व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून केली जाणारी देखभाल आणि दुरुस्तीची कामे योग्य प्रकारे झाली असती, तर आज ही बिकट परिस्थिती उद्भवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.
उन्हाळ्यात दिवसभर बंद ठेवूनही पावसाळ्यात ही स्थिती का? अभिजीत गुरव यांचा सवाल
भाजपचे जिल्हा सरचिटणीस व पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांनी महावितरणच्या या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात अर्धा तासही सलग वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याचे त्यांनी नमूद केले. उन्हाळ्यात दर सोमवारी अधिकृत देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवला जात होता, मग एवढी पूर्वतयारी करूनही पावसाळ्यात अशी दुरवस्था का निर्माण होते? असा थेट सवाल त्यांनी महावितरण प्रशासनाला विचारला आहे.
महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा संतप्त इशारा
तालुक्यातील सद्यस्थिती पाहता महावितरणने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून केली जात आहे. महावितरणने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या वाढत्या संतापाचा उद्रेक होऊन थेट महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 07-07-2026














