Bhadkamba Jal Jeevan Mission: जलजीवन मिशनची पाईपलाईन वारंवार फोडणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करा; भडंकबा दत्तवाडीतील ग्रामस्थ आक्रमक

साखरपा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल; आमदार किरण सामंत यांचे कारवाईचे आदेश

देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील भडंकबा दत्तवाडी येथे केंद्र सरकारच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत नव्याने टाकलेली पाण्याची मुख्य पाईपलाईन अज्ञाताकडून वारंवार फोडली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कृत्यामुळे गावात पाण्याचे मोठे संकट आणि आर्थिक नुकसान निर्माण झाले असून, संबंधित दोषी व्यक्तीवर तातडीने व कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी भडंकबा दत्तवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

Bhadkamba Jal Jeevan Mission: २० वर्षांनंतर सुटणार होती ३५० ग्रामस्थांची तहान; चाचणी झाली होती यशस्वी

भडंकबा दत्तवाडीमध्ये ४५ कुटुंबे राहत असून येथील एकूण लोकसंख्या सुमारे ३५० च्या आसपास आहे. या वाडीसाठी सुमारे २० वर्षांपूर्वी एक सार्वजनिक विहीर बांधण्यात आली होती. याच विहिरीवरून जलजीवन मिशन अंतर्गत जमिनीतून सुमारे अडीच ते तीन फूट खोल चर खोदून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. विहिरीपासून ते पाणी साठवणुकीच्या मुख्य टाकीपर्यंत ठेकेदाराने ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाण्याची चाचणी (ट्रायल) घेतली आणि ती यशस्वीही झाली होती. या यशस्वी चाचणीनंतर काही दिवसांतच घरोघरी नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू होणार होते.

लोखंडी हत्याराने पाडले होल; ठेकेदाराने दुरुस्त करताच पुन्हा फोडली

अधिकृत नळ जोडणी सुरू होण्यापूर्वीच काही समाजकंटकांनी या पाईपलाईनला लोखंडी हत्याराने होल पाडून व ती कापून टाकल्याचे उघडकीस आले. हा प्रकार समजताच ठेकेदाराने तातडीने ती पाईपलाईन पुन्हा दुरुस्त करून जोडली आणि पाण्याची दुसऱ्यांदा चाचणी घेतली. मात्र, पाण्याचा पुरवठा सुरळीत होताच पुन्हा अज्ञात व्यक्तीने तीच पाईपलाईन दुसऱ्या एका ठिकाणी फोडून प्रशासनाला आणि ग्रामस्थांना आव्हान दिले. पाईपलाईन वारंवार फोडली जात असल्याने वाडीचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.

साखरपा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल; आमदार किरण सामंत यांचे कारवाईचे आदेश

या गंभीर प्रकाराबाबत ग्रामस्थ आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने स्थानिक ग्रामपंचायतीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. ग्रामपंचायतीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून २४ जून रोजी साखरपा पोलीस दूरक्षेत्रात संशयित व्यक्तीच्या नावासह रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे.

तसेच ग्रामस्थांनी या अन्यायाबाबत आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर घातला. आमदार सामंत यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना साखरपा पोलिसांना दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 07-07-2026