देवरुख: देवरुख नगर पंचायतीने लादलेल्या जाचक आणि अन्यायकारक कर वाढीच्या विरोधात देवरुखवासीय कमालीचे आक्रमक झाले आहेत. या कर वाढीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) दांडी मारल्यामुळे संतप्त नागरिकांच्या रागाचा कडेलोट झाला. ‘मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच पुढील चर्चा केली जाईल’ असा पवित्रा नागरिकांनी घेतल्यामुळे अखेर सोमवारची ही बैठक तहकूब करून ती ९ जुलै रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Devrukh Tax Hike Meeting: मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून नागरिकांचा रोखठोक सवाल
‘पालकमंत्र्यांचा दौरा असल्याने उपस्थित राहू शकत नाही’ अशी सबब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढे केली असली, तरी ‘पालकमंत्री तर मुंबईत आहेत, मग दौरा कुठचा?’ असा थेट आणि रोकडा सवाल नागरिकांनी बैठकीत उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून देवरुख नगर पंचायत प्रशासनाने केलेल्या अवाजवी कर वाढीमुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सोमवारच्या बैठकीसाठी नगर पंचायतीच्या छत्रपती महाराष्ट्र सभागृहात एकत्र आले होते. मात्र, ऐनवेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येणे टाळल्याने नागरिकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत, प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे केवळ पळवाट म्हणून कारण दिले जात असल्याचा आरोप केला.
लोकप्रतिनिधींही बैठकीला गैरहजर; जनतेकडून तीव्र नाराजी
वाढीव घरपट्टी हा नागरिकांच्या थेट जिव्हाळ्याचा प्रश्न असताना जनतेतून निवडून आलेले सत्ताधारी नगरसेवक, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासन जेव्हा एखादा लोकविरोधी निर्णय घेत असेल, तर तो निर्णय नागरिकांच्या हिताचा नसल्यास निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यावर उघड विरोध करणे गरजेचे आहे, अशी मते यावेळी उपस्थित नागरिकांनी मांडली.
आरोग्य, शिक्षण, वृक्ष कर रद्द करण्याची मागणी; ९ जुलैच्या बैठकीकडे लक्ष
बैठकीत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना संपर्क उत्तर देण्याचा प्रयत्न अभिजित राणे यांनी केला. मात्र, निर्णय घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार त्यांना नसल्यामुळे मुख्याधिकारीच या बैठकीला हवेत, असा आग्रह नागरिकांनी धरला. अखेर मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ९ जुलै रोजी पुन्हा बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली.
वाढीव घरपट्टी ज्या पद्धतीने आकारण्यात आली आहे ती पूर्णपणे अमान्य असून, यातून आरोग्य, शिक्षण आणि वृक्ष कर तातडीने रद्द करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी नागरिकांनी केली आहे. आता या सर्व मागण्यांबाबतची अधिकृत उत्तरे नागरिकांना ९ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीतच मिळणार असून, या बैठकीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख उपस्थिती: या महत्त्वाच्या बैठकीला व्यासपीठावर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे आणि आस्थापना अधिकारी प्रवीण खरात उपस्थित होते. याशिवाय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबत सावंत, सोळजाई मंदिराचे अध्यक्ष बापू गांधी, माजी तहसीलदार शरदचंद्र गीते, नगरसेवक अक्षय झेपले, बाळा कामेरकर, निधा कापडी, रितिका कदम यांसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 07-07-2026














