आमदार किरण सामंत यांनी घेतला आढावा; अंतर्गत रस्त्यांच्या संथ कामावरून ठेकेदाराला फटकारले
रत्नागिरी:
रत्नागिरीकरांच्या हक्काच्या विमान प्रवासाचे स्वप्न आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. रत्नागिरीतील प्रस्तावित हायटेक विमानतळाचे मुख्य काम तब्बल ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कामे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, आमदार किरण सामंत यांनी सोमवारी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत एक विशेष आढावा बैठक घेऊन या भव्य प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
अंतर्गत रस्त्यांच्या संथ कामावरून तीव्र नाराजी; ‘रवी इन्फ्रा’ची मदत घेण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, एमआयडीसीचे अभियंता बी. एन. पाटील, न्याती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि अंतर्गत रस्त्यांचे काम करणारे ठेकेदार पाटील उपस्थित होते.
या बैठकीत विमानतळाच्या कामाचा वेग वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली. विमानतळाचे मुख्य बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले असले, तरी अंतर्गत रस्त्यांचे काम सध्या काहीसे संथ गतीने सुरू असल्याबद्दल आमदार सामंत यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार पाटील यांनी तातडीने ‘रवी इन्फ्रा’ कंपनीची मदत घ्यावी आणि रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशा कडक सूचना आमदार सामंत यांनी दिल्या. दरम्यान, विमानतळावरील इलेक्ट्रिकल कामे आता अंतिम टप्प्यात आली असून इतर पायाभूत सुविधांच्या कामांनाही वेग आला आहे.
३०० कोटींचा हायटेक प्रकल्प; वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश
रत्नागिरीचे हे विमानतळ सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आणि पूर्णपणे ‘हायटेक’ केले जाणार आहे. या भव्य प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, शासन स्तरावरून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेतच हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे, जेणेकरून रत्नागिरीकरांना लवकरच विमान सेवेची मोठी भेट मिळेल, असे स्पष्ट व कडक निर्देश आमदार किरण सामंत यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 14-07-2026














