मिरजोळे विभागप्रमुख ते तालुकाप्रमुख; युवासेना सचिव विकास गोगावले यांच्या स्वाक्षरीचे पत्र सुपूर्द
रत्नागिरी:
शिवसेना पक्षाच्या युवासेना रत्नागिरी तालुका प्रमुख पदी हर्षराज पाटील यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव (कोकण विभाग) व महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य विकास भरतशेट गोगावले यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत नियुक्ती पत्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हर्षराज पाटील यांना प्रदान करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार सोपवली जबाबदारी
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच युवासेना सरचिटणीस पूर्वेशभाई सरनाईक यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही तालुकाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी हर्षराज पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून, शिवसेना पक्ष वाढीसाठी तालुक्यातील सर्व घटकांना व युवकांना सोबत घेऊन ते आगामी काळात कार्यरत राहतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
मिरजोळे विभागातील कामाची घेतली दखल; शिवसैनिकांकडून अभिनंदन
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले, त्या वेळी राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, युवासेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) तुषार साळवी, पंचायत समिती सदस्य वैभव पाटील, तात्या सावंत, प्रथमेश पाटील, बारक्याशेठ हळदणकर, पंकज झगडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षराज पाटील यांनी यापूर्वी मिरजोळे विभागप्रमुख म्हणून पक्षात उल्लेखनीय काम केले होते. मिरजोळे भागातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक व रचनात्मक उपक्रम राबविले होते. त्यांच्या याच उत्कृष्ट कामाची आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काची दखल घेत शिवसेना वरिष्ठांनी त्यांच्यावर युवासेना तालुकाप्रमुख पदाची ही नवीन जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 14-07-2026














