Ratnagiri Ramraksha Andolan: अयोध्येतील कथित मंदिर गैरव्यवहाराविरोधात रत्नागिरीत उबाठा शिवसेनेचे ‘रामरक्षा आंदोलन’

शहरातील श्रीराम मंदिरात शिवसैनिकांचे रामरक्षा पठण; हिंदुत्वाच्या नावाखाली मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप

रत्नागिरी: ‘Ratnagiri Ramraksha Andolan’ (रत्नागिरी रामरक्षा आंदोलन) या अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरात एक महत्त्वाचे आंदोलन करण्यात आले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित चोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर, त्याचा निषेध म्हणून बुधवारी, १५ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात हे आंदोलन पार पडले. राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून स्थानिक शिवसैनिकांनी मंदिरात एकत्र येत सामूहिक ‘रामरक्षा स्तोत्र’ पठण केले.

या आंदोलनादरम्यान उबाठा शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला शहर संघटक सरोज बारोटे, माजी नगरसेविका रशिदा गोदड, प्रतिमा साळुंखे, विभागप्रमुख किरण तोडणकर, प्रकाश सुर्वे, संदेश भिसे, प्रकाश गुरव, दिलावर गोदड, शरद राणे, माजी सरपंच दीपक सुर्वे आणि माजी नगरसेवक सलील डाफळे यांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांनी केंद्र सरकार आणि मंदिर प्रशासनावर तीव्र शब्दांत तोफ डागली. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारणीसाठी देश-विदेशातील कोट्यवधी रामभक्तांनी आणि सामान्य नागरिकांनी आपल्या घामाचा पैसा अत्यंत भक्तीभावाने देणगी म्हणून दिला होता. मात्र, याच भक्तीभावाने दिलेल्या देणगीवर, सोन्या-चांदीच्या विटांवर, हिरे-माणके आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रमोद शेरे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, हा प्रकार म्हणजे थेट हिंदुत्वाच्या आणि जनतेच्या आस्थेच्या नावाखाली केलेला एक अत्यंत मोठा भ्रष्टाचार आहे. “आमचे हिंदुत्व हे ढोंगी नसून कट्टर आहे. अयोध्येतील पवित्र मंदिरात ज्यांनी हा गैरव्यवहार आणि चोरी केली आहे, त्या सर्व चोरट्यांचा आणि भ्रष्टाचाऱ्यांचा सर्वनाश कर, असे साकडे आम्ही प्रभू श्रीराम आणि मारुतीरायाला घालून प्रार्थना केली आहे,” असे शेरे यांनी यावेळी सांगितले.

Arihant 3

अयोध्येतील या प्रकरणावरून सध्या संपूर्ण देशातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्रभर हे आगळेवेगळे रामरक्षा आंदोलन सुरू केले असून, रत्नागिरीतील या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 16-07-2026