महालक्ष्मी मंदिराच्या जवळ ट्रक उभा करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लांजा येथील चालकावर कारवाई
खेडशी येथे मुख्य रस्त्यावर ट्रक पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी-हातखंबा महामार्गावरील खेडशी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
अनुप विजयन नायर (वय ४३, मूळ रा. तेलीवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रवीण कल्लापा पाटील यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संशयित चालकाने आपल्या ताब्यातील भारत बेंझ कंपनीचा ट्रक (क्रमांक MH 08 AP 3632) रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील खेडशी महालक्ष्मी मंदिराच्या जवळ मुख्य रस्त्यावरच उभा करून ठेवला होता. रस्त्याच्या मधोमध आणि धोकादायक पद्धतीने वाहन पार्क केल्यामुळे इतर वाहनांच्या ये-जा करण्यास व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद
मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संशयित चालक अनुप नायर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 20-07-2026














