दिल्लीतील जंतर-मंतरवर महिनाभरापासून आंदोलन सुरूच; तब्येत बिघडली तरी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांविरोधातील लढा सुरू ठेवण्याची NEET Paper Leak आंदोलकांची घोषणा
NEET Paper Leak प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. गेल्या एका महिन्यापासून कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांना टायफॉईड (Typhoid) झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. तब्येत खालावली असली तरी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधातील लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार दीपके यांनी व्यक्त केला आहे.
उपोषणानंतर तब्येत खालावली; सोशल मीडियावरून दिली माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी २० जुलै रोजी सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली होती. जंतर-मंतरच्या व्यासपीठावर काही दिवस उपोषण केल्यानंतर त्यांनी ते मागे घेतले होते. मात्र, त्यानंतर लागोपाठच्या धावपळीमुळे आणि शारीरिक त्रासामुळे त्यांची तब्येत ढासळली.
वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना टायफॉईड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “माझी तब्येत बिघडली असून मला टायफॉईडचे निदान झाले आहे. सध्या सकाळी आणि संध्याकाळी माझ्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तरीही शिक्षणमंत्र्यांविरोधात आमचा लढा असाच सुरू राहील,” असे दीपके यांनी या व्हिडिओत स्पष्ट केले.
आंदोलनावर परिणाम होणार का?
सोनम वांगचुक यांच्यावरील पोलिसांच्या कारवाईनंतर आक्रमक झालेले अभिजीत दीपके आजारी पडल्याने आंदोलनाच्या तीव्रतेवर परिणाम होईल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आंदोलनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे दोन प्रतिनिधी सातत्याने सरकारशी चर्चा करत असून, दीपके उपचाराधीन असताना त्यांचे इतर सहकारी जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 25-07-2026














