NEET Paper Leak: जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर

जंतर-मंतरवर आंदोलनाला हिंसक वळण; पोलीस कर्मचाऱ्यांसह आंदोलक जखमी, बिहारनंतर दिल्लीतही वातावरण तापले

NEET Paper Leak प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलन तीव्र झाले असून शनिवारी तेथे मोठा गोंधळ उडाला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलक आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आल्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीनंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तातडीने लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

NEET Paper Leak: जंतर-मंतरवर दगडफेक अन् अश्रूधुराच्या नळकांड्या

मिळालेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक सुरू केल्याने पोलिसांची सुरुवातीला मोठी पळापळ झाली. या दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यांसह काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तातडीने आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांच्या या कारवाईनंतर जंतर-मंतर परिसरात आंदोलकांची एकच पळापळ आणि धावाधाव झाली.

बिहारनंतर दिल्लीतही आंदोलनाची शेक; बंदोबस्तात मोठी वाढ

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आधीच बिहारमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. बिहारमधील पाटणा आणि छपरा येथे आंदोलकांनी जाळपोळ केल्यानंतर आता दिल्लीतील जंतर-मंतरवरही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत पोलिसांसोबतच काही आंदोलकही जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त अत्यंत कडक केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 25-07-2026