कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ पर्याय; चाचणी यशस्वी झाल्यास मोठ्या प्रमाणात छपाई शक्य
RBI Polymer Notes Project: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) १० आणि २० रुपये मूल्याच्या पॉलिमर (प्लास्टिक) बँक नोटांच्या प्रायोगिक तत्त्वावरील (Pilot Project) प्रस्तावाला केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार देशातील विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये प्लास्टिकच्या नोटा किती टिकाऊ आणि उपयुक्त ठरतात, याची पाहणी करण्यासाठी प्रत्येकी १०० कोटी (एक अब्ज) पॉलिमर नोटा चाचणीसाठी बाजारात आणल्या जाणार आहेत.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीवरून, रिझर्व्ह बँक अधिनियम १९३४ च्या कलम २५ अंतर्गत १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांच्या ‘फील्ड ट्रायल’साठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, ही चाचणी यशस्वी ठरल्यास भविष्यात या मूल्याच्या पॉलिमर नोटा नियमितपणे चलनात आणल्या जातील.
रिझर्व्ह बँकेच्या मते, सध्या वापरात असलेल्या पारंपरिक कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर नोटा अधिक मजबूत, टिकाऊ आणि पाणी व घाणीपासून सुरक्षित राहतात. जगातील अनेक देशांमध्ये आधीपासूनच प्लास्टिक नोटांचा वापर यशस्वीरीत्या सुरू आहे. भारतामध्ये या नोटांचा वापर वाढल्यास वारंवार खराब होणाऱ्या कागदी नोटांची छपाई आणि पुनर्बदलाचा मोठा खर्च दीर्घकाळासाठी कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, प्लास्टिक नोटांचा प्रयोग सुरू झाला तरी सध्या चलनात असलेल्या १० आणि २० रुपयांच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. पॉलिमर नोटांच्या चाचणीदरम्यान आणि भविष्यात त्या पूर्णपणे स्वीकारल्या गेल्यासही, कागदी व प्लास्टिक अशा दोन्ही प्रकारच्या नोटा एकाच वेळी कायदेशीर चलन म्हणून देशात सुरू राहतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 28-07-2026














