Kangana Ranaut On CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलनातील भाषेवर आणि वर्तनावर खासदार कंगनाची तीव्र नाराजी; सोशल मीडिया डिटॉक्सची केली मागणी
Kangana Ranaut On CJP Protest: हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघाच्या खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा तिच्या आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) जंतर-मंतरवरील ३६ दिवसांचे आंदोलन मागे घेतल्यानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलनादरम्यान समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या ‘जेन-झी’ (Gen Z) पिढीच्या रील्सवर आणि त्यांच्या भाषेवर तिने उघडपणे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकाच ठिकाणी इतका विद्रूप आणि घृणास्पद प्रकार कधीच पाहिला नाही. ‘जेन-झी’च्या आंदोलनाचे व्हायरल होणारे रील्स पाहून मला अक्षरशः मळमळल्यासारखे वाटत आहे. आंदोलनकर्त्यांची बोलण्याची पद्धत आणि प्रत्येक फ्रेममध्ये वापरली जाणारी भाषा अत्यंत असभ्य आणि संतापजनक आहे. संपूर्ण आयुष्यात असा कुरुप अनुभव मला पहिल्यांदाच आला आहे.”
‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी जंतर-मंतरवर जमलेल्या तरुण आंदोलनकर्त्यांच्या जडणघडणीवरच प्रश्न उपस्थित करत कंगनाने पुढे लिहिले, “भारत ही सुसंस्कृत आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जपणारी भूमी आहे. मात्र, तुम्ही स्वतःला ‘झुरळ’ (Cockroach) म्हणवून घेता आणि अगदी तशीच तुमची वागणूक व दिसणे आहे. तुम्ही जगाला फक्त तुमची घाण, कचरा आणि कुरुपता दाखवत आहात. या रील्सचा माझ्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला आहे की यातून सावरण्यासाठी मला आता तातडीने ‘डिजिटल डिटॉक्स’ची गरज आहे.”
यापूर्वीही २० जुलै रोजी कंगनाने विरोधक आणि आंदोलनकर्त्यांवर निशाणा साधला होता. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारवर अशा प्रकारे दबाव आणता येत नाही, असे सांगत तिने विरोधी पक्षांना थेट निवडणुका लढवून सत्तेवर येण्याचे आव्हान दिले होते. CJP चे आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी कंगना रनौतच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद उफळला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 28-07-2026














