Ratnagiri Agriculture News: ३७ हजार ५४० हेक्टरवर भात तर २ हजार ९७५ हेक्टरवर नाचणी लागवड
Ratnagiri Agriculture News: रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४० हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावर भात आणि नाचणीची पुनर्लागवड यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. यामध्ये ३७ हजार ५४० हेक्टर क्षेत्रावरील भात लावणीचा तर २ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावरील नाचणी लागवडीचा समावेश आहे. आगामी काही दिवसांत उर्वरित क्षेत्रावरील लागवड पूर्ण होईल, अशी माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी एकूण ५३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात आणि नाचणी लावणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात आणि ५ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. जून महिन्यात पेरण्या झाल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतातील रोपे पिवळी पडू लागली होती आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. मात्र, जुलैमध्ये सुरू झालेल्या धोधो पावसामुळे रोपांना संजीवनी मिळाली आणि लावणीची कामे वेगाने मार्गी लागली.
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी संगमेश्वर, रत्नागिरी आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये सर्वाधिक भात लावणी पूर्ण झाली आहे. याउलट सर्वात कमी भात लावणी मंडणगड तालुक्यात नोंदवली गेली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उर्वरित सुमारे ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील लावणीचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होईल.
तालुकानिहाय भात आणि नाचणी लावणीचा तपशील (हेक्टरमध्ये):
- रत्नागिरी: नाचणी ३२० हेक्टर | भात लावणी ५,५२० हेक्टर
- लांजा: नाचणी १४० हेक्टर | भात लावणी ३,४५० हेक्टर
- राजापूर: नाचणी ४०० हेक्टर | भात लावणी ५,१३० हेक्टर
- संगमेश्वर: नाचणी ९३ हेक्टर | भात लावणी ६,०१० हेक्टर
- गुहागर: नाचणी १,३५१ हेक्टर | भात लावणी २,४३२ हेक्टर
- चिपळूण: नाचणी २७६ हेक्टर | भात लावणी ५,१९८ हेक्टर
- खेड: नाचणी १०६ हेक्टर | भात लावणी ४,२०० हेक्टर
- दापोली: नाचणी १६९ हेक्टर | भात लावणी ४,१०० हेक्टर
- मंडणगड: नाचणी ८० हेक्टर | भात लावणी १,५०० हेक्टर
- एकूण: नाचणी २,९७५ हेक्टर | भात लावणी ३७,५४० हेक्टर
रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत ३७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भात पुनर्लागवड झाली असून, हवामानाची साथ अशीच राहिल्यास राहिलेले कामही लवकरच पूर्ण होईल.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 28-07-2026














