राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताप्रमाणेच आता ‘वंदे मातरम्’चा अपमान ठरणार फौजदारी गुन्हा; विरोधकांच्या गदारोळात आणि सभात्यागात विधेयक संमत
Vande Mataram Bill अंतर्गत ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला कायदेशीर संरक्षण देणारे ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक २०२६’ बुधवारी राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळात मंजूर करण्यात आले. लोकसभेत पेपरफुटीसंदर्भातील लोक परीक्षा विधेयकावरून झालेल्या गदारोळानंतर राज्यसभेत हे महत्त्वाचे विधेयक संमत झाले. या नव्या कायद्यामुळे आता राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम्’चा जाणीवपूर्वक अवमान करणाऱ्याविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
Vande Mataram Bill अन्वये ३ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
सध्याच्या ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्या’नुसार राष्ट्रध्वज, भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यांना कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. आता या नव्या दुरुस्तीमुळे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समावेशही या कायद्याच्या कक्षेत करण्यात आला आहे. प्रस्तावित तरतुदींनुसार, ‘वंदे मातरम्’च्या गायनात जाणूनबुजून अडथळा निर्माण करणे, ते गाण्यापासून रोखणे किंवा राष्ट्रीय गीताचा अनादर करणारी कोणतीही कृती हा दंडनीय गुन्हा मानला जाईल. या गुन्ह्यासाठी दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला कमाल तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
विरोधकांची निदर्शने आणि सभात्यागात विधेयक संमत
राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ‘नीट’ (NEET) प्रश्नपत्रिका गळतीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर पोलिसांनी कथितपणे केलेल्या बळप्रयोगाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. या मागणीवरून झालेल्या गदारोळानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग (वॉकआउट) केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर हे विधेयक संमत केले.
राष्ट्रीय अस्मिता आणि कायदेशीर संरक्षण
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य प्रतीक राहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीतावरून सातत्याने राजकीय आणि सामाजिक वाद पाहायला मिळत होते. काही ठिकाणी हे गीत म्हणण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप होत होता, तर काही घटकांकडून याच्या राष्ट्रभक्तीच्या प्रतीकावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, नव्या दुरुस्ती विधेयकामुळे आता ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीतासारखाच वैधानिक दर्जा आणि कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:09 29-07-2026














